मुंबई - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. जळपास अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे नागरिक घरातच बसून आहेत. प्रदीर्घ काळापर्यंत घरातच बसून राहण्याचा नागरिकांचा हा पहिलाच अनुभव असेल. मात्र, यादरम्यान कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, अशा प्रकारची गुन्हेगारी वाढली असल्याचे समोर आले आहे.
राज्य महिला आयोगाकडे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी वाढल्या
लॉकडाऊनच्या काळात राज्य महिला आयोगाकडे आतापर्यंत राज्यभरातून एकूण 196 तक्रारी ई-मेलच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. यात औरंगाबाद विभागातून 17, अमरावती विभागातून 11, नाशिक 17, पुणे विभागातून 42 , कोकण विभागातून 34, नागपूर विभागातून 6 तर मुंबईतून 49 घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी आहेत. तसेच राज्य महिला आयोगाकडे 20 अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्यात जिल्हा किंवा विभागाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव आस्था लुथरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरवी राज्य महिला आयोगाकडे दिवसाला 70 तक्रारी ई-मेल, पोस्ट किंवा प्रत्यक्ष येऊन दिल्या जात होत्या. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पीडित महिलांना घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष येऊन तक्रारी देण्याचे प्रमाण घटले आहे. राज्य महिला आयोगाकडून घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना तक्रार करण्यासाठी 1-1800-21-0980 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. जो सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरू असतो. या बरोबरच मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही पीडित महिला तक्रार नोंदवू शकतात. पीडित महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराचा न्यायनिवाडा करण्यासाठी सध्या राज्य महिला आयोग पोलीस व काही एनजीओच्या मदतीने लॉकडाऊन काळात काम करीत आहे.
लॉकडाऊन काळात देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत मे महिन्यात बलात्काराचे 19 गुन्हे घडले आहेत. यात अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे 15 गुन्हे घडले आहेत. तर महिलांवर बलात्कार झाल्याचे 4 गुन्हे दाखल आहेत. एप्रिल महिन्यात मुंबई शहरात महिलांवरील अत्याचाराचे 89 गुन्हे घडले आहेत. मात्र, मे महिन्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून यात अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी व शाररिक अत्याचार असे एकूण 138 गुन्हे घडले आहेत. या 138 गुन्ह्यांपैकी तब्बल 58 प्रकरणांचा छडा पोलिसांनी लावला आहे.