मुंबई - राज्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत होते. आता राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णामध्ये घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यावरुन मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे. 'राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली की, जनता जबाबदार आणि कमी कमी झाली की, सरकार आणि प्रशासनाचे यश. अशी दुटप्पी भूमिका का? तसेच सुप्रीम कोर्टाला प्रत्यक्षात मुंबईची रियालिटी माहित आहे का?' असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
संदीप देशपांडे यांचे ट्वीट
'आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजेच रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाचे यश. अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात?' असा सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे. संदीप देशपांडे यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे.
'सुप्रीम कोर्ट डोक्यावर पडले आहे का?'
महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने व निती आयोगाने मुंबई मॉडेलचे कौतुक केले आहे. सुप्रीम कोर्टाने केलेले कौतुक पाहून प्रश्न पडतो की, सुप्रीम कोर्ट डोक्यावर पडले आहे का? सुप्रीम कोर्टाला मुंबईतील प्रत्यक्ष परिस्थिती माहित आहे का?' असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे.
हेही वाचा - मुंबईसाठी थेट जागतिक बाजारपेठेतून करणार लसींची खरेदी - आदित्य ठाकरे