मुंबई - कोरोनामुक्तीसाठी देशाने लसीकरण मोहिमेला वेग दिला आहे. त्यानुसार आता लवकरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. हा गट सर्वाधिक बाहेर राहणारा, नोकरी-धंदा करणारा आहे. त्यामुळे यांचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, लसीकरणाबाबत अनेक अफवा आणि गैरसमज ऐकायला मिळत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी लस हाच रामबाण उपाय आहे. लस घेतल्यानंतर कोणताही मोठा साईडइफेक्ट होत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता तरुणांनी लस घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
ही त्रिसूत्री पाळा -
कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टनसिंग ही त्रीसूत्री लस घेण्या अगोदर आणि लस घेतल्यानंतर पाळणे अत्यंत गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, आता आपल्याला कॊरोनाची भीती नाही, असे म्हणत 18 ते 44 वयोगटाने बिनधास्त राहण्याची चूक करू नये, असा सल्ला सेव्हन हिल्स कोविड हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिला. कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात 18 ते 44 पर्यंतचा गट मोठ्या संख्येने आहे. म्हणूनच दुसऱ्या लाटेत हा गट मोठ्या संख्येने बाधित झालेला दिसत आहे. हीच बाब लक्षात घेत डॉ. अडसूळ यांनी लस घेतल्यानंतर मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझेशनचे नियम पाळा, असे आवाहन केले आहे.
काही दिवस धूम्रपान आणि मद्यपान टाळा -
धूम्रपान आणि मद्यपान करणारी सर्वाधिक लोकसंख्या 18 ते 44 या गटातीलच आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान एक-दोन आठवडे तरी धूम्रपान-मद्यपान करू नये. लस घेतल्यानंतर या गोष्टी करणे आरोग्यासाठी चांगले नाही, असेही डॉ. अडसूळ यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे गरोदर मातांना तसेच स्तनपान देणाऱ्या (सहा महिन्यांचे बाळ असणाऱ्या) महिलांना लसीकरणातून वगळण्यात आले आहे. पण, जर स्तनपान करणारे बाळ सहा महिन्यांपेक्षा मोठे असेल तर अशा माता लस घेऊ शकतात. त्यांना कोणताही साइड इफेक्ट्स होत नाही, असेही डॉ. अडसूळ यांनी सांगितले.
मासिक पाळीतही घेता येते लस -
सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे ती म्हणजे मासिक पाळीत मुलींनी-महिलांनी लस घेऊ नये. डॉक्टरांनी मात्र ही बाब खोडून काढली असून अशा अफवांना बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. मासिक पाळीत, पाळीच्या पहिल्या किंवा कोणत्याही दिवशी लस घेतली तरी त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ऋतु चक्र बदलत नाही किंवा त्यावर कोणताही परिणाम होत नसल्याची माहिती, फोर्टीस रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सोनल कुमठा यांनी दिली. सोशल मीडियावर जी मासिक पाळी आणि लसीबाबत माहिती फिरत आहे ती चुकीची आहे. त्यामुळे बिनधास्त लस घ्या आणि कोरोनाला दूर ठेवा, असा सल्ला त्यांनी महिला-मुलींना दिला आहे.
हेही वाचा - मुंबई आयआयटीकडून देशाला मोठा दिलासा; नायट्रोजन युनिटचे ऑक्सिजन युनिटमध्ये यशस्वी रूपांतरणाचा प्रयोग