मुंबई - येथील नायर रुग्णालयामध्ये एका 28 वर्षीय डॉक्टरने त्याच्या रूममध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा 28 वर्षीय डॉक्टर काही दिवसांपूर्वी त्याच्या गावी जाऊन आला होता. त्यानंतर त्याच्या रूममध्ये त्याचे शव आढळून आलेले आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आग्रीपाडा पोलिसांकडून तपास सुरू -
आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव भिम संदेश प्रल्हाद तुपे असे आहे. नायर रुग्णालयातील नवव्या मजल्यावरील रूम नंबर 903 मध्ये हा भीम संदेश राहत असल्याची माहिती समोर येत आहे. तो भूलतज्ञ होता. त्याने काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील आपल्या गावी जाऊन आल्यानंतर 15 फेब्रुवारी रोजीला साडेदहाच्या सुमारास स्वतःला इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद घेतली आहे.
हेही वाचा - ठाणे : कंटेनरची 5 वाहनांना धडक, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यासह तिघे कुटुंबीय मृत्युमुखी
याआधीही घडली आत्महत्येची घटना -
दरम्यान, मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये 22 मे 2019ला मानसिक तणावाखाली असलेल्या डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. यासंदर्भात डॉक्टर भक्ति मेहरे, डॉक्टर अंकिता खंडेलवाल, डॉक्टर हेमा अहुजा यांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली होती.