मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या डाॅक्टर, पोलीस, पत्रकार तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच घराबाहेर दिसत आहेत. त्यात डाॅक्टर जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत. सध्याचे कोरोनाचे संकट पाहता डाॅक्टरी पेशा सोडलेल्या एका तरुणाने परत वैद्यकीय सेवेला सुरूवात केली आहे. या डॉक्टरचे नाव आहे परमेश्वर मुंडे.
हेही वाचा- संचारबंदीत दारूचे गोडाऊन फोडणाऱ्या चोरट्यांना अटक
परमेश्वर हा मुळचा बीडच्या परळी वैजनाथचा आहे. मात्र, सध्या तो चेंबूरमध्ये वास्तव्या, आहे. परमेश्वरने एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण केले. पण गिर्यारोहनाची आवड असल्याने त्याचे मन डोंगरमाथा, गडकिल्ल्यांमध्येच रमायचे. मात्र, दीड-दोन महिन्यांपुर्वी मुंबईसह देशात कोरोनाचा व्हायरस आला आणि या व्हायरसने हाहाकर माजवला. त्यामुळे परमेश्वरच्या आतला डाॅक्टर जागा झाला. त्याने कस्तुरबा रुग्णालयात सेवा सुरू केली.
कस्तुरबा रुग्णालयातील डॅाक्टर, नर्स, आया, वॅार्डबाॅय सगळेच सैनिकासारखे कोरोनाशी दोन हात करत आहेत. कोरोनाच्या भीतीने मोठमोठे, अनुभवी डॅाक्टरांना घाम आला आहे. अशावेळी दोन वर्षे डॅाक्टरी पेशापासून दूर असलेल्या परमेश्वरने आपल्या पेशाला सुरुवात केली आहे. त्यामुळे एकार्थाने कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी परमेश्वरच धावून आल्याची भावना रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची आहे.