मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळणे हे अनपेक्षीत आहे. मला याबद्दल काहीच माहीत नव्हते. याबाबत, आत्मपरीक्षण करणार असल्याची प्रतिक्रिया माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
हेही वाचा - भाजपची चौथी यादी जाहीर; खडसे, तावडे, मेहता, पुरोहित यांना डच्चू
भारतीय जनता पक्षाने आपली चौथी यादी आज (शुक्रवारी) जाहीर केली. त्यातदेखील माजी मंत्री आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे, माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि पक्षाचे प्रतोद राज पुरोहीत यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयानंतर तावडे प्रथमच पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच पक्ष माझ्या बाबतीत आगामी काळात योग्य निर्णय घेईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तर आधी देश नंतर पक्ष असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ..या कारणांमुळेच खडसे, तावडे, मेहता, पुरोहीत यांचा पत्ता झाला कट ?
मी संघाचा कार्यकर्ता आहे. समाजाचे कल्याण करणे हा आमचा अजेंडा आहे. आता निवडणूक समोर आहे तर सगळ्यांनी झटून काम केले पाहिजे. मी मंत्रिमंडळ कार्यकाळात चांगले काम केले आहे. तिकिटाबाबत पक्षाचा हायकमांड निर्णय घेत असतात. आता पक्ष वाढीसाठी कार्य करत राहणार आहे. पक्षावर माझा पूर्ण विश्वास आहे. तर माझ्यावर संघ आणि विद्यार्थी परिषदेचे संस्कार असल्याने कुणीही अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे तावडे यांनी सांगितले.
2014 साली विनोद तावडे हे बोरिवली मतदारसंघातुन निवडून आले होते. मात्र, नेहमी वेगवेगळ्या निर्णयासाठी वादग्रस्त राहिलेले तावडे यांना तिकीट नाकारत या जागी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आले आहे.