मुंबई- राज्यातून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी पोलीस कर्मचारी, अधिकारी, नर्स, डॉक्टर यांसह इतर कर्मचारी आतोनात प्रयत्न करत आहे. या काळात त्यांचे एकही रुपया वेतन कपात करू नये. गरज पडल्यास लोकप्रतिनिधींच्या मानधनामध्ये पूर्ण कपात केली तरी चालेल. संकट समयी स्वतः चा जीव धोक्यात घालून काम करत असलेल्यांच्या सेवेबद्दल त्यांना अधिक बोनस द्यावा, अशी मागणी राज्यातील भाजप पक्षाने केली आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्य सरकारचे आर्थिक गणित कोलमडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात होणार आहे. तसेच, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांच्या पगारातही तब्बल ४० टक्क्यांची कपात होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, सर्वांचे करा, पण पोलीस खाते, आरोग्य खाते यांची वेतन कपात करू नका, त्यांना अधिक बोनस द्या, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम आणि नितेश राणे तसेच इतर भाजप आमदारांनी केली आहे.
हेही वाचा- 'मुंबईत कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी प्रभागांमध्ये भरारी पथके करणार तपासणी'