मुंबई : सीएसएमटी स्थानकात रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 10 बॉक्सचे वाटप करण्यात आले. विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण संवेदना या संस्थेमार्फत बूट पॉलिश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या बॉक्सचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अभिनेते महेश मांजरेकर व मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे उपस्थित होते.
प्रधानमंत्री स्वायत्त निधी अंतर्गत करणार मदत : या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, "दीनदयाळ उपाध्याय यांचे स्वप्न होते की, आपण समाजात शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत देशाचा विकास झाला असे होत नाही. याच संकल्पनेतून भाजपचे अनेक कार्यकर्ते काम करत आहेत. आज श्रीकांत भारतीय यांनी त्यांच्या तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून अपेक्षित असाच कार्यक्रम ठेवला. त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे अंतर्गत येणाऱ्या बूट पॉलिश करणाऱ्या जवळपास 500 मजुरांना हे नवीन बॉक्स उपलब्ध करून दिले आहेत. इतकेच नाही तर ते या मजुरांना प्रधानमंत्री स्वायत्त निधी अंतर्गत मदत देखील करणार आहेत. एखाद्या राजकीय कार्यक्रमापेक्षा अधिक चांगला कार्यक्रम आज इथे पार पडला.
कसा आहे हा बॉक्स? दर्पण या संस्थेतर्फे जे बॉक्स देण्यात आले ते या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय सोयीचे ठरतील असे दानवे यांनी म्हटले. बूट पॉलिश करणारे कर्मचारी आतापर्यंत जमिनीवर एखादे कापड किंवा पुठ्ठा टाकून आपल्या कामाला बसायचे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे. मात्र, आता जे बॉक्स देण्यात आले आहेत त्या बॉक्स सोबत एक छोटी पाटासारखी खुर्ची देखील देण्यात आली आहे. जेणेकरून त्यावर बसून हे कर्मचारी बूट पॉलिश करतील. सोबतच या कर्मचाऱ्यांच्या पाठीला देखील आराम मिळेल. जुन्या बॉक्स प्रमाणेच या बॉक्सला देखील तळव्याच्या साईजचा एक स्टॅन्ड देण्यात आला आहे. तर, दोन ड्रॉवर देखील या बॉक्समध्ये देण्यात आले आहेत. जेणेकरून या ड्रॉवरमध्ये हे कर्मचारी आपल्या वस्तू ठेवू शकतील.