मुंबई : 2019 च्या निवडणुकीनंतर अडीच वर्षे महाविकास आघाडीची राज्यात सत्ता होती. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. मात्र आता अजित पवार शिंदे - फडणवीस सरकारला डोईजड झाले आहेत. प्रत्येक बाबतीत आग्रही राहणं, आग्रह न पाळल्यास त्यांचा राग येणं, असं अजित पवारांचं वर्तन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवीन नाही. अजित पवारांच्या अनेक हट्ट पुरवल्यानंतर लोकसभेच्या जागावाटपाचा हट्ट पूर्ण करणं अवघड झालंय. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आठवडाभरात दुसऱ्यांदा दिल्लीला जावं लागलंय.
आजारावर पालकमंत्री पदाची मात्रा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. ते सध्या शिंदे-फडवणीस सरकारमध्ये भाजप, शिंदे गटावर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. या आठवड्यात अजित पवार पालकमंत्री पदाच्या वादावर नाराज झाले होते. अजित पवार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही अनुपस्थित होते. तेव्हा ते आजारी असल्याचं सांगण्यात आलं होतं. एवढंच नाही तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेणारे, अजित पवार यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानीही गेले नाहीत. अजित पवारांच्या या नाराजीमागं पालकमंत्रिपद असल्याचं बोललं जात होतं. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन पालकमंत्रीपदाचा वाद मिटवला. त्यानंतर अजित पवारांकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली.
हट्टापायी भाजप नेत्यांवर अन्याय : अजित पवारांच्या हट्ट पुरवले जात असताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाही आपलं पालकमंत्रिपद सोडावं लागलं. पालकमंत्र्यांच्या नव्या यादीत नऊपैकी सात ठिकाणी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडं असलेलं पुण्याचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुणे, बारामती लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष घातलं होतं. शिंदे-फडवणीस यांची सत्ता येताच अजित पवारांनी त्यांना हवी असलेली महत्त्वाची खाती बळकावली. त्यानंतर त्यांनी उघडपणे पालकमंत्रीपदाचा आग्रह धरून नाराजी व्यक्त केली. अखेर शिंदे फडवणीस यांनी दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करून तोडगा काढला. आता लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून अजित पवारांची नाराजी समोर येत आहे.
अंतर्गत विरोध असतानाही सत्तेत : जेमतेम सरकारमध्ये सामील होऊन चार महिने झालेल्या अजित पवार यांनी प्रत्येक बाबतीत हट्ट करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांच स्थिर सरकार असताना अजित पवार यांना सत्तेत घ्यायची काहीच आवश्यकता नव्हती, असा मतप्रवाह खाजगीत व्यक्त होतं होता. तरीही अजित पवार यांना भाजपच्या वरिष्ठांनी सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं. त्या पाठोपाठ महत्त्वाची मंत्रिपदही अजित पवार गटाला देण्यात आली. इतकंच नाही, तर अजित पवार यांना वित्त मंत्रालय दिलं, जाऊ नये यासाठी दबाव टाकण्यात आला होता. अशा परिस्थितीतसुद्धा अजित पवारांना वित्त मंत्रालय देण्यात आलं. तसंच पालकमंत्री पदावरही त्यांचा हट्ट पुरवला गेल्यानं भाजप तसंच शिंदे गटाचे आमदार, खासदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार गटाच्या महिला, बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद हव आहे. परंतु शिंदे गटाचे स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी त्याला विरोध केलाय. अशातच आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपनं मिशन 45 टार्गेट आखलं आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाचा तिढा कसा सोडवायचा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. अजित पवार जास्तीत जास्त जागा आपल्याकडं खेचण्यासाठी प्रयत्नात असताना एकनाथ शिंदे गटही 18 ते 20 जागांची मागणी करत आहे. अशा परिस्थितीत हा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी पोहोचला आहे.
अजित पवारांचे हट्ट वाढले : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अजित पवार यांच्या कार्यपद्धतीबद्दल वक्तव्य केलंय. आमच्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते. त्यावेळी जे नाराज होते, त्यांच्याच उरावर आज अजित पवार बसले आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अजित पवार महाविकास आघाडीत असताना त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला होता. कधीही नाराजी दाखवली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवार महाविकास आघाडीचे प्रमुख होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार हे सर्वांत मातब्बर नेते आहेत. त्यामुळं ते प्रत्येक बाबतीत ठाम आहेत. त्यांच्या आडमुठेपणानं भाजपबरोबरच शिंदे गटालाही त्रास होत, असल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा -