मुंबई - कामावर उशीरा येणाऱ्या व लवकर घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आरोग्य संचालनालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याविरोधात आरोग्य सेवा संचालनालयाचे सहसंचालक संजय पतंगे यांनी आदेश काढले आहेत. अशा कर्मचाऱ्यांमुळे कामाचा खोळंबा होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य संचालनालयातील कामकाजाची वेळ ही 9.45 ते 6.15 आहे. आता मात्र, कर्मचाऱ्यांना वेळ पाळणं बंधनकारक असणार आहे.
कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. आरोग्य संचालनालयातील कामकाजाची वेळ ही 9.45 ते 6.15 आहे. सध्या राज्यातील आरोग्य सेवाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्यालय आहे. मात्र घरी जायची घाई असल्यामुळे आरोग्य संचालनालयातील कर्मचारी लवकर घरी जात आहेत. त्यामुळे संचालनालयातील न्यायालयीन प्रकरणे, रजा, गैरहजर प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे, असे अनेक प्रकरणे प्रलंबित असतानाही काही अधिकारी, कर्मचारी सायंकाळी 5.30 वाजता न सांगता कार्यालय सोडत आहे.
यामुळे अनेक कामे रखडत आहेत. यामुळे कारवाई करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याची परवानगी घेतल्याशिवाय अधिकारी व कर्मचार्यांनी कार्यालय सोडता येणार नाही आहे. असे केल्यास त्यांची त्या दिवसाची गैरहजेरी समजून विनावेतन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित कर्मचारी व अधिकार्यांवर शासकीय नियमानुसार योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आदेश काढण्यात आला आहे.