मुंबई: मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित नागराज मंजुळे बायोपिक बनवणार आहे. कोल्हापूरच्या एका कुस्तीच्या स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना नागराज मंजुळे यांनीही घोषणा केली आहे. खाशाबा जाधव यांनी जागतिक कीर्तीच्या कुस्तीत आपले नाव कोरले. देशाला नावलौकिक मिळवून दिला होता. आपण त्यांच्यावर लवकरच चित्रपट काढणार आहोत. याबाबतची अधिकृत घोषणा आपण लवकरच करू, असे प्रसार माध्यमांशी बोलताना नागराज मंजुळे म्हणाले आहेत.
खाशाबा जाधव यांच्यावर चित्रपट: खाशाबा जाधव यांच्या जीवनावर चित्रपट काढणे हे खरेच अभिमानास्पद असेल. १९५२ च्या हेलंसिकी ऑलम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा कास्यपदक खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. त्यांची कारकीर्द नेमकी कशी होती ती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. या चित्रपटात चित्रीकरण कोठे करायचे याबाबत देखील शोध केला जाईल. मात्र खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यासाठी आपण उत्सुक आहोत, असेही नागराज मंजुळे यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
नागराज मंजुळे करणार दिग्दर्शन: नागराज मंजुळे हे नेहमीच एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक राहिले आहेत. त्यांचा मागचा चित्रपट बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. झोपडपट्टी वस्तीतील मुलांना जागतिक दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या कोचची भूमिका झुंड या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी साकारली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला देखील भरभरून प्रतिसाद दिला होता. याव्यतिरिक्त नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेले सर्वच चित्रपट हे वेगळ्या जोनरचे ठरले आहेत.
चित्रपटाबाबत उत्सुकता: सैराट या चित्रपटाने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत नागराज मंजुळे यांना एक मोठी ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर या दोन्हीही चित्रपटसृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक अनुराग बासू यांनीही नुकतेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे याच्यासोबत काम करायला आपल्याला नक्की आवडेल असे म्हटले होते. त्यामुळेच नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित बायोपिक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या चित्रपटात नेमके कोणाला संधी मिळणार, हा चित्रपट नेमका कसा असणार, याबाबतची उत्सुकता त्यांच्यामध्ये चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे.