मुंबई - 'ड्रग्ज' बाळगणे आणि त्यांचे सेवन करण्याच्या आरोपाखाली सध्या 'एनसीबी'च्या ताब्यात असलेल्या रिया चक्रवर्तीने आता हळूहळू इंडस्ट्रीमधील काही बड्या लोकांची नावे घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र, ही नावे पुढे येताच बॉलिवूडमधील त्या लोकांनी रिया विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने गेले तीन दिवस रियाची कसून चौकशी सुरू केली असून त्यात तिने बॉलिवूडमधील काही मोठी नावे घेतल्याची माहिती माध्यमांना समजली आहे. यात दिग्दर्शक मुकेश छाबडा यांचेही नाव घेतल्याचे समजतंय. एकूण 25 जणांची नावे रियाने एनसीबीला दिली असून या सगळ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची बातमी एका खासगी वृत्तवाहिनीने दिली होती.
हेही वाचा - रियाच्या चौकशीत बॉलिवूडमधील काही व्यक्तींची नाव उघड; लवकरच होणार चौकशी
मात्र, ही बातमी बाहेर येताच दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी आपले मौन सोडले, या संपूर्ण प्रकरणात आपण रियाची साथ दिली नसल्याने तिने सूड घेण्यासाठी आपले नाव घेतले असावे, असा दावा त्यांनी केला. आपण ड्रग्जच काय साधी सिगरेट, ड्रिंक्स देखील घेत नाही. तरीही या प्रकरणी रियाने आपले नाव घेतल्याने आपल्याला धक्का बसला आहे. याबाबत आपण लवकरच कायदेशीर सल्ला घेणार असून रियावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण या क्षेत्रात प्रचंड मेहनत करून आलो असून त्यानंतर इथे आपले नाव कमावले आहे. त्यामुळे कुणालाही आपल्यावर सवैर आरोप करायची परवानगी देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - रिया चक्रवर्तीसह सर्व आरोपींचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला
या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस आणि आता सीबीआय, ईडी आणि एनसीबीच्या ताब्यात असल्याने आपण याबाबत गप्प होतो. तपास यंत्रणांनी सुशांतच्या मृत्यूचे सत्य समोर आणावे, अशीच आपली इच्छा होती. मात्र, आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागून त्यात आपले नाव नाहक गोवले जात असल्याने रियावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचारात असल्याचे त्यांनी सांगितले.