मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बाजार समित्या बरखास्त करणार असल्याचे विधान केले आहे. या त्यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या गळ्यात फास आवळणारा असल्याचे मुंडे म्हणाले.
बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि कामकाज शेतकऱ्यांच्या शेतीमालाला वाजवी दर देण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे बाजार समित्या बरखास्त करण्याबाबत आम्ही सर्व राज्य सरकारांसमवेत बोलत आहोत. आम्हाला याकरिता ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक प्रभावीपणे राबवायचे असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे दिली आहे. यावर धनंजय मुंडेंनी टीका केली आहे.
सरकार घेऊ इच्छित असलेला निर्णय हा शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास आवळणारा असल्याचे मुंडेंनी म्हटले आहे. आधीच शेतकरी कर्जमाफी, कमी हमीभाव, पिकांची नासाडी अशा संकटांनी त्रस्त आहे. त्यात हे असं जुलमी सरकार आहे, असले जुलमी सरकार नको म्हणत मुंडेंनी सरकारला लक्ष्य केले.