मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच दिवस जपान दौर्यावर होते. मुंबईत आल्यानंतर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. याप्रसंगी त्यांनी जपानमधील पाच दिवसांमध्ये झालेल्या भेटीगाठी, करार, त्याचबरोबर जपान सरकारने महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी घेतलेला पुढाकार यासर्व विषयांची माहिती दिली.
वर्सोवा ते विरार 42 किमी सीलिंक : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत आल्यावर प्रसन्न वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून जपानसोबत जे उत्कृष्ट संबंध ठेवले त्या कारणाने आज जपान व भारत फार जवळ आले आहेत. जपान सरकारने राज्य अतिथी म्हणून मला आमंत्रण दिलं होतं. माझ्या पाच दिवसाच्या दौऱ्यामध्ये विविध अधिकारी, मंत्री, पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाच्या बैठका झाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्सोवा ते विरार 42 किलोमीटरची सी लिंक तयार करायची आहे. त्याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपानने दिलं आहे. या सी लिंकमुळे एमएमआर रिजन मधील पूर्व, पश्चिम येथील भाग पूर्णतः ट्रॅफिक मुक्त होणार आहे. आता यासंदर्भात केंद्र सरकारकडून त्यांना प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक : देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबईमधील महत्त्वाची मेट्रो 11 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते वडाळा ही अंडर ग्राउंड मेट्रो लाईन तयार करण्यासाठीही जपानने अनुकूलता दाखवली आहे. त्यासाठी ते निधी उपलब्ध करून देणार आहेत. टोकियो शहरात पूर नियंत्रण परिस्थिती हाताळण्यासाठी ज्या पद्धतीची यंत्रणा कार्यरत आहे. त्याच पद्धतीची यंत्रणा मुंबईमध्येसुद्धा कार्यरत करण्यासाठी त्यांनी अनुकूलता दाखवली आहे. या दौऱ्यामध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांशी चर्चा झाली असून, मोठ्या प्रमाणात उद्योग हे महाराष्ट्रात आणता येणार आहेत. त्यासाठी अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करायला तयार आहेत. यासाठी जपानमध्ये व त्याचबरोबर महाराष्ट्रातसुद्धा आपण एक टीम तयार करत आहोत.
भारतातील गुंतवणूक सुरक्षित : जपान आतापर्यंत चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आला आहे. परंतु आता त्यांना भारतात गुंतवणूक करायची आहे. कारण भारतातील गुंतवणूक ही त्यांना फार सुरक्षित वाटते. यामुळे नवीन भारताच्या क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. जपान दौऱ्यावर तेथील मराठी लोकांनी मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलं. त्यामुळे फार आनंद झाल्याचंही फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर जपानमधील भारतीय दुतावासात चंद्रयान 3 लँडिंग हे तेथील भारतीय लोकांसोबत पाहता आलं ही एक पर्वणी असल्याचंही त्यांनी सांगितलं. तेथील लोकांमध्ये भारत देशाविषयी देशभक्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर कोयासन विद्यापीठाने दिलेली डॉक्टररेट ही माझी नसून, संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान याने झाला आहे असंही ते म्हणाले.
हेही वाचा -