नवी मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी जळगावमध्ये बोलताना भाजपवर टीका केली होती. हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान त्यांनी भाजपला दिले होते. त्यावर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही सरकार पाडण्यासाठी हापापलेलो नाही. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर नव्याने निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. हिमंत असेल तर चला जनतेच्या कोर्टात, तुम्ही तीन पक्ष आहात आम्ही एकटे आहोत. बघुया कोण विजयी होते, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले. नवी मुंबई येथे भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात फडणवीस बोलत होते.
देशात अराजकता माजवण्यासाठी, सत्तेसाठी समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम विविध पक्ष करत आहेत. 'सीएए'विषयी ज्येष्ठ नेते शरद पवार लोकांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत. सीएएमुळे भटक्या-विमुक्तांवर अन्याय होणार असल्याचे ते सांगत आहेत. त्यांना सीएएमुळे काय होणार आहे, हे चांगले माहीत असताना ते लोकांची दिशाभूल करत आहेत. हे खोटे बोलणे त्यांनी बंद करावे, असे फडणवीस म्हणाले.
आम्ही विरोधकांना आव्हान देतो, त्यांनी सीएएमुळे देशातील कोणत्या भटक्या विमुक्त, आदिवासी यांना कोणता धोका आहे, हे सांगावे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी माफी मागावी, असे आव्हान त्यांनी दिले. देशात भटके विमुक्त, आदिवासी, मागास यांच्याशिवाय देश होऊ शकत नाही. यामुळेच मोदी यांनी आरक्षण संपल्याबरोबर त्याची मुदत वाढवून दिली. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे बोलले जात आहे, भागवत यांच्या नावाने नवे संविधान टाकले गेले, त्यामुळे देशात आता ही एक ठराविक दृष्टीकोन ठेऊन त्यासाठीची लढाई सुरू झाली आहे.
हेही वाचा - नवीन आर्थिक वर्षापासून सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; शरद पवारांनी दिले संकेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, माननीय बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री होण्याचे आश्वासन दिले होते का? त्यांना जर तसे आश्वासन दिले असते, तर त्यांनी तुम्हाला कधीही माफ कले नसते. औरंगाबादमध्ये शिवसेना कोणते तोंड घेऊन आघाडी करते हे आम्हाला पाहायचे आहे. औरंगाबादमध्ये भाजप आपला महापौर बसवल्याशिवाय राहणार नाही. नवी मुंबई आणि औरंगाबाद या दोन महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
भीमा-कोरेगावच्या प्रकरणानंतर अर्बन माओवादाचा विषय समोर आला. त्याचे पूर्ण पुरावे दिले गेले आहेत. शरद पवारांच्या दबावाखाली गृहमंत्र्यांनी सांगितले की, एएनआयला तपास देणार नाही. मात्र, त्याबाबतीत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो की, त्यांनी गृहमंत्र्यांचे ऐकले नाही.
हेही वाचा - वैयक्तिक स्वार्थासाठी 'त्यांनी' जनादेशाचा अपमान केला - नड्डा
माओवादाला पाठीशी घालण्याचा पवारांचा प्रयत्न -
पवारांचा या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सत्य बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी त्यांची एसआयटीची मागणी होती. माओवादाला पाठीशी घालण्याचा पवारांचा प्रयत्न आहे. मात्र, सत्य बाहेर आल्याशिवाय राहाणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
राज्यात सेना-भाजप युतीला जनादेश मिळाला होता, परंतु उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वार्थासाठी या जनादेशाचा विश्वासघात केला. यामुळे आज शिवसेना अधर्माच्या बाजूने उभी असल्याने त्यांच्या विरोधात लढावेच लागेल. धुळ्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आम्ही सेनेला आणि त्यांच्यासोबत आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीवर मात केली, तसेच आम्ही राज्यात येणाऱ्या निवडणुकांवर मात करू, नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा फडकवू आणि औरंगाबाद महापालिकेवरही भाजपची सत्ता आणू असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
देशात अशांतता निर्माण केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकदीने उतरावे लागेल. आता कार्यकर्त्यांचे ऐकून घेण्याचे नाही, तर आता सूनवण्याचे दिवस आले आहेत. आपल्याला आता लढाई जिंकायची आहे, अनेकवेळा विरोधीपक्ष म्हणून जीवन गेलेले आहे, आपला डीएनए आहे, पण विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी अंग चोरून काम न करता रस्त्यावर भिडावे लागते, सरकारला भीडावे लागते. आम्ही तयार आहोत असे सांगत फडणवीस यांनी उपस्थितांना तुमची तयारी आहे का, थेट मुकाबला करण्याची? असा तीन वेळा सवाल केला, त्याला उपस्थितांनी होकार देत प्रतिसाद दिला. त्यानंतर फडणवीस यांनी पहिला मुकाबला आम्ही करू आणि सरकारला जेरीस आणल्या शिवाय सोडणार नाही, असा इशारा दिला.