मुंबई : Devendra Fadnavis on Babri : देशात सध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. तसेच, त्याबाबत देशात एक धार्मिक वातावरण निर्माण झालय. तर, एकीकडे राजकीय वातावरणही चांगलचं गरम झाल्याचं पाहायला मिळतय. भाजपा राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, रामावर विश्वास आहे, तोच राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होऊ शकतो.
मी तर काही दिवस तुरुंगात : "काही लोक कधीच राम मंदिराशी संबंधित कोणत्याही आंदोलनाचा भाग नव्हते, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लगावलाय. मी 'कार सेवे'मध्ये तीनदा भाग घेतला. जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. असही ते यावेळी म्हणाले. "जेव्हा कारसेवा शिगेला पोहोचली होती, तेव्हा काही लोक लपून बसले होते. याबद्दल मी काय सांगू? मी तर काही दिवस तुरुंगातही घातले, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
देशातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रम होणार : २२ जानेवारीला देशातील एकही मंदिर नसेल जिथे हा कार्यक्रम साजरा केला जाणार नाही. अयोध्या राममंदिराच्या प्रतिकृतीवर रथ तयार करण्यात आलाय. त्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झालं. हा रथ राज्यातील विविध भागात फिरणार आहे. फडणवीस यांच्यासोबत बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजनही यावेळी उपस्थित होते.
राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणे हे क्षुद्र : "५०० वर्षांच्या संघर्षानंतर देशात राममंदिराची उभारणी होत आहे. बाबरने आमच्यावर लावलेला डाग आम्ही दूर करत आहोत. आम्ही देशाचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करत आहोत. आपले मतभेद मिटवायला हवेत." ते मतभेद सगळं विसरून रामनामाचा जप झाला पाहिजे. या मुद्द्यावर राजकारण करणे हे क्षुद्र आहे." असंही फडणवीस यावेळी म्हणालेत.