मुंबई : पुण्यातील भीमा - कोरेगाव विजयस्तंभ येथे 2018 साली झालेल्या दंगली प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलण्याची विनंती केली आहे. यावर आता देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भटकवण्याचे व लक्ष दुसरीकडे वेधण्याचे काम करत असल्याची टीका फडणवीसांनी केली आहे.
'आयोगाने देवेंद्र फडणवीसांना बोलवावे' : 2018 साली पुण्यातील भीमा - कोरेगाव विजयस्तंभ येथे दंगल झाली होती. या नंतर भीमा-कोरेगाव आयोगासमोर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. आयोगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना चौकशीला बोलावले होते. त्यावर बोलताना आंबेडकरांनी म्हटले की, आयोगाने मला चौकशीला बोलवण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना चौकशीसाठी बोलवावे. त्याचप्रमाणे तेव्हाचे तत्कालीन मुख्य सचिव सुमित मल्लिक आणि तत्कालीन पोलीस ग्रामीणचे आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी बोलवावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आयोगाने प्रकाश आंबेडकर यांना 5 जून रोजी साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले होते. त्याला उत्तर देताना त्यांनी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे आपण साक्ष नोंदवण्यासाठी येऊ शकत नसल्याचे आयोगाला कळवले होते.
'प्रकाश आंबेडकर निष्णात वकील' : प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याबाबत लोकांनी या पूर्वीसुद्धा अर्ज केले आहेत. त्यावर आयोगाला जो काही निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतला आहे. आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे. प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील असून याबाबत त्यांना पूर्ण माहिती आहे. परंतु प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता अशा प्रकारची विधाने करत आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे.