मुंबई Devendra Fadnavis Meet Piyush Goyal : निर्यातबंदीमुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. त्यामुळं कांदा प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतलीय. या भेटीनंतर पीयूष गोयल यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून या भेटीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या प्रश्नावर उद्या, (सोमवारी) दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी गोयल यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती दिली. या भेटीची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बैठकीनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात शेतकरी, कांदा, सोयाबीन, कापूस या महत्त्वाच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय.
सोमवारी दिल्लीत कांदा प्रश्नावर महत्त्वाची बैठक : केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानं विरोधकांनी हिवाळी अधिवेशनातही मुद्दा लावून धरलाय. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गेल्या शुक्रवारी विधानसभेत बोलताना आवश्यकता भासल्यास सोमवारी (उद्या) दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री गोयल यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमधील काही ठराविक कांदा व्यापाऱ्यांना घेऊन केंद्रीय मंत्री गोयल यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.
निर्यातबंदी तत्काळ उठवावी : कांदा निर्यातबंदीमुळं नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळं कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. राज्यात या प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शनं करण्यात येत आहेत. सरकारनं निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत. आता दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा -