मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज (रविवार) निवड करण्यात आली. त्यांचे अभिनंदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यातील सत्तांतरानंतर भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांना विरोधी बाकांवर बसावे लागले आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, असे महाविकास आघाडीचे सरकार तयार झाले आहे. १६९ आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर ठाकरे सरकारने विधानसभेत शनिवारी बहुमत सिद्ध केले. तर भाजप आमदारांनी कामकाज नियमाला धरून होत नाही, असे सांगत सभात्याग केला होता. आज (रविवारी) महाविकास आघाडीचे नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
जे 25 वर्षे सोबत होते ते विरोधात आणि जे विरोधात होते ते सोबत - मुख्यमंत्री
यावेळी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जे 25 वर्षे सोबत होते ते विरोधात बसले आहेत आणि जे विरोधात होते ते सोबत बसले आहेत.