मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवला. हा मुस्कटदाबीचा प्रकार असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कंगनाच्या सर्वच वक्तव्याचे भाजपा कधीही समर्थन करणार नाही. मात्र, केवळ आपल्या विरुद्ध कोणीतरी बोलते आहे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे, याला 'सूड' म्हणतात. कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई ही सूड बुद्धीने झालेली आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मालीन झाली असल्याची परखड टीका फडणवीस यांनी केली.
कंगनाच्या पाली हिल येथील 'मणिकर्णिका' कार्यालयाची 8 सप्टेंबरला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी 354 कलमान्वये नोटीस पाठवली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महानगपालिकेने कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई केली होती.राज्य सरकारने कंगनाकडे लक्ष देण्यापेक्षा कोरोनाकडे लक्ष द्यावे. कोरोनाची महामारी संपलेली नाही, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करून कंगनाच्या मागे लागले आहे, असे फडणवीस म्हणाले.