मुंबई - नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी 6 मंत्र्यांना पदावरून पायउतार केले आहे. या मंत्र्यांची कामगिरी चांगली नसल्यानेच त्यांना नारळ दिला असल्याचे चर्चिले जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत अतिशय सावध भूमिका घेत वक्तव्य केले आहे. त्यांनी नव्या चेहऱ्यांना चांगले काम करण्याची संधी मिळावी, यासाठी नवीन लोकांना संधी दिल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबरोबरच त्यांनी याचा अर्थ जुन्या मंत्र्यांनी चांगले काम केले नाही, असेही म्हटले आहे.
- मंत्र्यांना डच्चू देण्याला कारणीभूत स्थिती -
प्रकाश मेहता
मेहता यांच्याकडे असलेल्या गृहनिर्माण खात्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणात प्रकाश मेहता यांची भूमिका संशयास्पद होती. एमपी मिल कंपाऊंड एसआरए प्रकरणात अपरोक्ष फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे. त्यामुळे हा शेरा प्रकाश मेहतांसाठी कारणीभूत ठरला. तसेच लोकयुक्तांच्या चौकशीतही मेहता यांचा कारभार पारदर्शक नसल्याचे निदर्शनाला आले आहे.
राजकुमार बडोले
सामाजिक न्याय विभागाचा कारभार करताना गेल्या वर्षी आपल्याच कन्येला परदेशी जाण्यासाठी फेलोशिप देण्याचे प्रकरण गाजले होते. त्याबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत झालेला उशीर बडोलेंना भोवला आहे.
विष्णू सवरा
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस होती. आदिवासी वन जमिनींच्या प्रकरणात सवरा यांना प्रभावी काम करता आले नाही. तर नाशिकहून निघालेला लाँग मार्च थोपवण्यातही त्यांना अपयश आले. शिवाय आदिवासी बहुल जिल्हा पालघरचे पालकमंत्री असतानाही त्यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवली.
दिलीप कांबळे
सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना राबविण्यात दिलीप कांबळे अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क देण्यातही दिरंगाई झाली. तसेच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी जवळीकता कांबळे यांना भोवली असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवीण पोटे
पर्यावरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार असूनही या खात्यावर प्रविण पोटे यांना गेली 4 वर्षे पकड ठेवता आली नाही. तसेच अमरावतीमधील स्थानिक प्रश्नावर मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
राजे अंबरीशराव
आदिवासी विभागातून आमदार झालेले राजे अंबरीशराव यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. तसेच मंत्री पदाचा कार्यभार असूनही त्यांचा जनसंपर्क कमकुवत बनला. मंत्रालयातही राजे अनेकदा दिवसेंदिवस गैरहजर राहिले त्याचा फटका त्यांना बसला.
या कारणांचा कोणताही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला असला तरी मुख्यमंत्र्यांचे सर्वात विश्वासू सहकारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले की, गेल्या 4 वर्षातल्या कामांचे अहवाल, मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तपासले गेले आहे. त्यामुळेच काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
तसेच प्रकाश मेहता यांच्याबाबत आता खुलासेवार बोलता येणार नाही. याबाबत लोकयुक्तांच्या निर्देशावर येणारा अहवाल सभागृहात येईल, त्यावेळी अधिक बोलता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.