मुंबई - देवांशी रावत या 13 वर्षीय मुलीने रशिया येथे पार पडलेल्या वर्ल्ड चिल्ड्रेन विनर्स गेम्स 2019 मध्ये जलतरण आणि बुद्धीबळ स्पर्धेत 2 सुवर्ण पदके पटकावली आहेत. विशेष म्हणजे कर्करोगासारख्या दुर्धर आजराशी झुंजतानाही देवांशीने सुवर्ण पदके पटकावली आहेत.
मॉस्कोमध्ये वर्ल्ड चिल्ड्रेन विनर्स गेम्स 2019 या कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांसाठी 4 जुलै ते 7 जुलै दरम्यान विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ट्रॅक, बुद्धिबळ, फुटबॉल, टेबल टेनिस, जलतरण, रायफल शूटिंग आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये देवांशीने अवघ्या 2 महिन्यात या स्पर्धेची तयारी केली. त्याबरोबरच तिने रशियात भारताचे प्रतिनिधित्व करत 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत.
देवांशी ही कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकते. तर तिच्यावर टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ती नेहमीप्रमाणे मेडिकल चेकअपसाठी रुग्णालयात गेली असताना डॉक्टरांकडून तिला या स्पर्धेची माहिती मिळाली. त्यानंतर प्राथमिक चाचण्या पार पडल्यानंतर तिची रशियात होणाऱ्या वर्ल्ड चिल्ड्रन्स विनर गेममध्ये निवड झाली. तिच्यासोबत भारतातून 10 स्पर्धक तर देशभरातून 500 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
परदेशात जाऊन जिंकले ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. माझ्या जिंकण्याचे श्रेय आई-वडील आणि माझ्याकडून अवघ्या 2 महिन्यात तयारी करून घेतलेल्या प्रशिक्षक शरद वझे, केदार पळसुरे, चेसगुरू प्रकाश शहा व या खेळात खेळण्याची संधी दिल्याबाबत टाटा मेमोरियल ट्रस्टला देत असल्याचे देवांशीने सांगितले.
कँसरसारखा आजार झाला असताना मी माझे मनोबल खचून दिल नाही. त्यामुळेच मी हा पल्ला गाठू शकले. इतरांनीही खचून न जाता धैर्याने सामोरे जायला हवे, असा सल्ला देवांशीने मुलांना दिला आहे.