मुंबई : कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद चिरडत चालला आहे. कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील येणाऱ्या वाहनांची तोडफोड झाल्यानंतर राज्यभर याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मात्र महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी (Karnataka Maharashtra border dispute) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्यासोबत फोनवर चर्चा केली असल्याची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की, कर्नाटक राज्यात महाराष्ट्रातील वाहनांची होणारी तोडफोड ही योग्य नाही. दोन्हीही राज्यात वाहनांची अशाप्रकारे तोडफोड होता कामा नये. कर्नाटक राज्यात जे सुरू आहे. त्याबबात स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करतील, अशी ही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादामुळे दोन्ही राज्यातील वाहतूक व्यवस्था सध्या बंद करण्यात आलेली आहे. कन्नड वेदिकाचे काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, ही वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. तर वाहनांच्या होणाऱ्या तोडफोडीवर उपमुख्यमंत्री यांनी चिंता व्यक्त केली आहे.
कर्नाटक मधील संघटना कन्नड रक्षण वेदिकेच्या हिंसक कारवाया वाढल्या असून; हिरेबाग वाडी परिसरात गाड्या फोडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाने पुन्हा एकदा उग्ररूप धारण केले असून; कर्नाटकातील ही संघटना आक्रमकपणे हिंसक कारवाया करत आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्त देखील व्यक्त केल्या होत्या. यावरुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले होते.