मुंबई - पुण्यातील कोरोना बाधित कुटुंबाला घरापर्यंत पोहचवणाऱ्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. त्या चालकाने या कुटुंबाला सोडल्यानंतर ज्या सात ते आठ प्रवाशांना सेवा पुरवली होती, त्यांचीही आता वैद्यकीय चाचणी घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल दुपारपर्यंत हाती येणार आहे. हा अहवाल गंभीर आल्यास राज्य सरकार कोरोनाच्या दक्षतेसाठी मोठा निर्णय घेऊ शकते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाचवर पोहचली असून या सर्वांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील स्वतंत्र कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत. पुण्यातील एका कुटुंबाला कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले. हे कुटुंब दुबई येथे सहलीसाठी जाऊन आले होते. पती-पत्नीनंतर त्यांच्या मुलगीची चाचणी घेण्यात आली असता तिला लागण झाल्याचे दिसून आले. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांपैकी एका रुग्णामध्ये सोमवारी करोनाची सौम्य लक्षणे दिसून आली.
हेही वाचा - पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पाचवर
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याची विनंती पवार यांनी नागरिकांना केली. स्वत: कोणतेही औषधे घेऊ नका असेही ते म्हणाले. काही शंका आल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे, तसेच उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी असे आवाहन पवार यांनी केले. त्या प्रवाशांचा अहवाल आल्यानंतर कॅबिनेटची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.