मुंबई - आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून लौकिक असलेल्या मुंबई महापालिकेच्या बँकांमधील मुदत ठेवी नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्थायी समितीत एक आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीनुसार पालिकेच्या विविध बँकांमध्ये तब्बल ७९ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे म्हटले आहे. मागील दोन वर्षात या रक्कमेत १५ हजार कोटींची वाढ झाली आहे.
पालिका कर्मचाऱ्यांची निवृत्तीनंतरची देय रक्कम, अर्थसंकल्पातील खर्च न झालेली रक्कम तसेच पालिकेच्या विविध प्रकल्पांसाठी लागणाऱ्या रक्कमेचा यात समावेश असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा - गड किल्ल्यांवर हॉटेल आणि मॅरेज हॉल कदापि होऊ देणार नाही - खासदार छत्रपती संभाजीराजे
मुंबई महापालिकेने ७ ते ७.३१ टक्के व्याजाने बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, युनियन बँक, सिंडिकेट बँक, इंडियन ओवरसीज बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक या बँकांमध्ये ७९ हजार कोटी मुदत ठेव म्हणून ठेवले आहेत. जून २०१७ पर्यंत विविध बँकांमध्ये पालिकेच्या ६४ हजार ४८२ कोटींच्या ठेवी होत्या. ३१ मार्च २०१९ पर्यंत विविध बँकांतील ठेवींची रक्कम ७६ हजार ५७९ कोटींवर गेली. ३० जून २०१९ पर्यंत या मुदत ठेवींचा आकडा ७९ हजार ०९१ कोटी रुपयांवर गेला आहे.
हेही वाचा - मुंबई प्रदेश काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी एकनाथ गायकवाड यांच्यावर...
प्रकल्पांसाठी रक्कम -
मुदत ठेवींमध्ये २१ हजार कोटींची रक्कम कंत्राटदारांची अनामत रक्कम, पालिका कर्मचारी, अधिकारी यांच्या पीएफ, ग्रॅच्युटी आदींच्या ठेवी आहेत. उर्वरित ५५ हजार कोटींची रक्कम ही कोस्टल रोड, गोरेगाव - मुलुंड लिंक रोड, मलजल प्रक्रिया प्रकल्प, प्रस्तावित पाणी प्रकल्प यासारख्या प्रकल्पांवर खर्च करण्यासाठी सुरक्षित ठेवली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पालिकेने या मुदत ठेवींमधून बेस्टला अद्याप १६०० कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. बेस्टला पालिका आणखी ४०० कोटी रुपयांची मदत करणार आहे. पालिकेने आपले प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी तसेच आपला खर्च भागवण्यासाठी गेल्या दोन वर्षात या मुदत ठेवींपैकी काही मुदत ठेवी तोडल्या आहेत.