मुंबई : मुंबईमधील सर्वात मोठे डंपिंग ग्राउंड म्हणून देवनारची ओळख आहे. या डम्पिंग ग्राऊंड मध्ये कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या मिथेन वायूमुळे अनेकवेळा आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कचऱ्याची दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आगी आणि दुर्गंधी मधून नागरिकांना दिलासा देण्यासाठी, जैव संवर्धक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा (Deonar Dumping Fire Use of Enzyme Based Bio Enrichment) निर्णय महापालिका प्रशासनाने (Municipality to Deodorize Mumbai) घेतला आहे. Deonar Dumping Ground
देवनार डम्पिंग ग्राउंड : देवनार गोवंडी येथे मुंबई महापालिकेचे सर्वात मोठे डम्पिंग ग्राउंड आहे. ते देवनार डम्पिंग ग्राउंड म्हणून ओळखले जाते. १२० हेक्टर परिसरात डम्पिंग ग्राउंड असून रोज ५०० ते ७०० मॅट्रिक टन कचरा येथे टाकला जातो. या डम्पिंग ग्राऊंडची क्षमता कधीच संपली आहे. हे डम्पिंग लवकरात लवकर बंद करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने मुंबई महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी नवी मुंबईमधील तळोजा येथील जमीन दिली आहे. याठिकाणची जमीन अद्यापही पालिकेने ताब्यात घेऊन त्यावर डम्पिंग ग्राउंड सुरु केलेले नाही.
आगीच्या घटना आणि दुर्गंधी : देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणाऱ्या कचर्याचे विघटन व्हायला सुरुवात झाल्यावर त्यामधून मिथेन हा लँडफिल गॅस तयार होतो. ज्वालाग्राही मिथेन वायू आणि वातावरणातील होणारे बदल यामुळे अनेक वेळा ‘पॉकेट फायर’ म्हणजेच आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. आग बाजूच्या परिसरात पसरण्याची तसेच प्रदूषणाची भीती असते. तसेच कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे देवनार, गोवंडी, घाटकोपर, चेंबूर, विक्रोली आदी परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.
एन्झाइम आधारित जैव संवर्धकाचा वापर : देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील आगीच्या घटना आणि दुर्गंधी रोखण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एरोबिक एन्झाइम आधारित जैव संवर्धक वापरले जाणार आहे. एन्झाइम आधारित जैव संवर्धकामुळे कचऱ्याचे लवकर विघटन होऊन दुर्गंधी कमी होते. एरोबिक विघटनाला चालना दिल्यामुळे मिथेन वायूच्या निर्मितीचे प्रमाण कमी होते. परिणामी आग लागण्याचे प्रमाणही कमी होते. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी महापालिका १ कोटी ८८ लाख ६१ हजार ६०० रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मिथेनचे प्रमाण ४५ टक्क्यांनी घटले : कचर्याच्या एरोबिक विघटनाचा दर वाढवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ३ हजार लिटर एन्झाइम आधारित जैव संवर्धक घेण्यात आले होते. एक एकर जागेवर याची फवारणी करण्यात आली होती. याचे परीक्षण नामांकित मेसर्स ट्रान्स ठाणे क्रीक वेस्ट मॅनेजमेंट असोसिएशनकडून करण्यात आले. त्यात मिथेन गॅसची निर्मिती तब्बल ४५ टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले. या परिसरात आगीही लागल्या नाहीत, अशी माहिती पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. Deonar Dumping Ground