मुंबई - मराठा व कुणबी समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या सारथी संस्थेसाठी राज्यसरकारने पुण्यातील शिवाजीनगर येथील भांबुर्डा येथे 4 हजार 163 चौरस मिटरची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सुविधा असणार नव्या इमारतीत
मराठा व कुणबी समाजाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास व्हावा या उद्दिष्टाने सारथी संस्थेची स्थापना 2018 मध्ये राज्यसरकारकडून करण्यात आली होती. पुण्यातील जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीत शासकीय कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, हॉल आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत.
नव्या जागेमुळे दिलासा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले असले तरी अद्याप मराठा समाजातील तरुण आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, आरक्षण मिळण्यापूर्वी मराठा समाजातिल तरुण वर्गाला शिक्षण क्षेत्रात दिलासा मिळावा यासाठी सारथी संस्था राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. आता या संस्थेच्या इमारतीसाठी जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने मराठा समाजातील तरुणांना दिलासा मिळणार आहे.
केवळ नावापुरती संस्था
केवळ नावापुरती सारथी संस्थेची स्थापना केली गेली असून या संस्थेमार्फत कोणताही लाभ मिळत नसल्याचे आरोप वेळोवेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी केला होता.
हेही वाचा - वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्या; अन्यथा महावितरण कार्यालयांना टाळे ठोकू