मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे शेलार यांच्यासह कुटुंबीयांना समुद्रात फेकून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या आगोदर देखील त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला अटक केली होती. आता पुन्हा धमकीचे पत्र आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयात पोष्टाने आले आहे.
गुन्हा दाखल - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कार्यालयाला पाठवलेल्या धमकीच्या पत्राप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी भादंवि कलम ५०४, ५०६(२), ५०७ आणि ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तुकडे-तुकडे करण्याची धमकी : या पत्रातून आशिष शेलार यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली. धमकीच्या पत्रात भाजप, शिंदे गटाच्या विरोधात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये आज अज्ञात व्यक्तीने पाठवलेले पत्र सापडले आहे. आशिष शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली आहे.
गेल्या वर्षी मिळाली होती धमकी : भाजप आमदार आशिष शेलार यांना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. शेलार यांनी पत्र लिहून पोलिसांकडे तक्रार दिली होती. अवघ्या २४ तासांत मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली होती. भाजप आमदार आशिष शेलार यांना त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर शेलार यांनी पोलिसाकडे धाव घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका इसमाला अटक केली होती. ओसामा समशेर खान असे या 48 वर्षीय इसमाचे नाव होते. समशेर खानने आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जावे मारण्याची धमकी दिली होती.
काय होते प्रकरण? : माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे भाजप आमदार आशिष शेलार चर्चेत आले होते. शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकी देण्यात आली होती. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती आशिष शेलार यांनी पोलिसांना केली होती. अवघ्या 24 तासांत मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या.