मुंबई : औद्योगिक वसाहती, वाहनांची वाढती संख्या यासह विविध कारणांमुळे मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि पालिका कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, परंतु तरीही गोवंडीत वायुप्रदूषणामुळे क्षय, दमा यांसारख्या विविध आजारांनी नागरिक ग्रस्त आहेत. इतकेच नव्हे, तर आता वायु प्रदूषणाचा परिणाम प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत अचानक ५० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इथल्या नागरिकांनी केला आहे.
बकऱ्या कोंबड्यांच्या मृत्यूने लाखोंचे नुकसान : या संदर्भात बोलताना इथले कोंबड्यांचे व्यवसायिक इस्तियाक अहमद शेख अब्बासी म्हणाले की, सुरुवातीला माझा बकऱ्यांचा व्यवसाय होता. मात्र, माझ्या बकऱ्यांच्या हळूहळू मृत्यू होऊ लागला. मग मी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले. मात्र, नंतर कधी सहा, कधी चार, कधी तीन असा कोंबड्यांचा मृत्यू होऊ लागला. असा माझ्या तब्बल 50 हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. आमच्या दुकानासमोरच आम्ही काही झाडे लावली आहेत. आम्ही ही झाड रोज साफ करतो. म्हणजे या झाडांवर पाणी मारतो, त्यांच्या पानांवर जी काही धूळ बसलेली असते ती आम्ही साफ करतो. त्यावेळी आमच्या लक्षात आले इथल्या हवेत धुळीचे प्रदूषण जास्त आहे. या प्रदूषणामुळेच या प्राण्यांचा पक्षांचा मृत्यू होत आहे. यात माझे काही लाखांचे नुकसान झाले आहे.
प्रदूषणाने गोवंडीत सर्वाधिक मृत्यू : देवनार डम्पिंग ग्राउंड, एसएमएस कंपनी आणि सिमेंट मिक्सर प्रकल्प यामुळे दिवसेंदिवस गोवंडी परिसरात प्रदूषणाचा धोका वाढत आहे. या प्रकल्पांचा परिणाम इथल्या राहिवाशांवर झाला आहे. या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेकांना श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये श्वसनाच्या आजाराने मृत्यू झालेल्यांपैकी सर्वाधिक लोक हे फक्त गोवंडीमधील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून देवनार डम्पिंग ग्राउंडमधून पसरणारी दुर्गंधी, प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आजारांनी इथल्या स्थानिक राहिवाशांना ग्रासले आहे. त्यातच २००९ मध्ये याच परिसरात रुग्णालयातील जैववैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने प्रकल्प उभारला.
मेडिकल वेस्ट कंपनी हद्दपार करा : मुंबई महानगरपालिकेने उभारलेला हा मेडिकल वेस्ट म्हणजेच जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प एसएमएस कंपनीमार्फत चालविण्यात येत आहे. या कंपनीत मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचर्याची विल्हेवाट लावण्यात येते. या कंपनीमधून मोठ्या प्रमाणात विषारी धूर हवेत सोडला जात असल्याचा आरोप देखील इथल्या स्थानिक रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, याचा परिणाम थेट येथील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे ही कंपनी या परिसरातून हद्दपार करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून वारंवार करण्यात येत आहे.
मुंबईकरांचा प्रदूषणाने मृत्यू : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांवर नेमके काय परिणाम झालेत? या प्रदूषणाने किती जणांचा मृत्यू झाला? याची आकडेवारी गोवंडीतील माहिती अधिकार कार्यकर्ते शेक फैयाज आलम यांनी मागितली. त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला तसा माहिती अधिकारांतर्गत अर्ज दिला. त्यांना जी माहिती मिळाली ती धक्कादायक आहे. याबाबत बोलताना फैयाज सांगतात की, मी पालिकेकडे 2016 ते 2021 या पाच वर्षात प्रदूषणामुळे किती जणांचा मृत्यू झाला? याची माहिती मागवली होती. पालिकेने मला जी आकडेवारी दिली आहे त्या, आकडेवारीनुसार प्रदूषणामुळे मागच्या पाच वर्षात तब्बल ६ हजार ७५७ मुंबईकरांचा मृत्यू झाल्याची माहिती मला मिळाली आहे. यात क्षयरोग, दम्याचे आजार, हृदयविकार अशा आजारांचा समावेश आहे. जे श्वसनामुळे आणि प्रदूषणामुळे होतात.
आम्हाला एअर प्युरिफायर द्या : गोवंडीत दिवसेंदिवस इतक प्रदूषण वाढते की, इथल्या लोकांना श्वास घेणे देखील आता कठीण होऊ लागले आहे. गोवंडीत श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. हे आजार इथल्या प्रदूषणामुळेच होत असल्याचा दावा इथल्या स्थानिकांचा आहे. त्यामुळे अनेकांनी तर आपल्या घरात आणि ऑफिसमध्ये एअर प्युरिफायर बसवून घेतले आहेत. मात्र, या एअर प्युरिफायरची किंमत अधिक असल्याने ते सर्वांनाच परवडत नाहीत. गोवंडी हा भाग मजुरांचा आहे. इथे अनेक जण मजुरी करतात, त्यामुळे सर्वांनाच तो परवडेल असे नाही. त्यामुळे सरकारने मोठी सार्वजनिक एअर प्युरिफायर यंत्रे गोवंडीत बसवावीत किंवा कमी दरातील सर्वांना परवडतील अशी स्वस्त एअर पुरिफायर यंत्रे गोवंडीकरांना उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी इथल्या स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
ऑक्सिजन सिलेंडर घेऊन रस्त्यावर फिरण्याची वेळ : दरम्यान, एकीकडे बीएमसीने यंदा 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील गोवंडी परिसरात वाढत्या प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. या हजारो कोटींच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालिकेने वेळीच योग्य पावलं न उचलल्यास भविष्यात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन रस्त्यावर फिरण्याची वेळ मुंबईकरांवर येऊ शकते.
हेही वाचा : Satara News: उन्हाच्या तीव्रता वाढली; कोयना धरणातून 2050 क्युसेक पाण्याचा विसर्ग