मुंबई : बेधडक वक्तव्य, कट्टर हिंदुत्ववादी आणि न पटणाऱ्या गोष्टींवर परखड भाष्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेगळा ठसा उमटवला होता. सर्वच पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा कितीही वाद असला तरी त्यांच्याबरोबर अखेरच्या क्षणापर्यंत मैत्री जपली. शरद पवार त्यांचे पक्के राजकीय वैरी परंतु, तेवढेच त्यांचे जिवलग मित्र (Death anniversary of Balasaheb Thackeray) होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर ते सातत्याने टीका करत, पण त्यांच्याशी बाळासाहेबांचे सलोख्याचे संबंध होते. कितीही मोठे नेते व उच्चपदस्थ राजकारणी असू देत वेळप्रसंगी त्यांच्यावर आसूड ओढायला व त्यांनतर मैत्रीपूर्ण संवाद साधायला बाळासाहेब ठाकरे कधी कमी पडले नाहीत. आज बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली शिवसेना दुभंगली आहे. विरोधकांशी असलेले वैर पक्षात पाहायला मिळत आहे.
सामाजिक प्रश्नांवर भाष्य : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. सन १९५० मध्ये ते फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून कामाला लागले होते. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या समवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियत कालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे जाहिरातीचे डिझाइन बनवून देण्याचे काम करीत होते. त्यांच्या व्यंगचित्रात विरोधक नेहमीच रडारवर असायचे. विशेष इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा बहुचर्चित असायची.
प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली : बाळासाहेबांनी पुढे फ्री प्रेस जर्नल मधली नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे कुशल वक्ते संघटक होते. त्यांची ठाकरी भाषा मराठी माणसांच्या ह्रदयाला भिडणारी होती. वक्तृत्वा बरोबरच बाळासाहेब ठाकरे यांची लेखणी तलवारीच्या धारेपेक्षा तेज होती. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात नेहमी जाणवत असायचा. बाळासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या क्रांतिकारी विचाराना तिलांजली देत हिंदुत्वाचा पुरस्कार (Balasaheb Thackeray Death Anniversary) केला.
बाळासाहेब कट्टर हिंदुत्ववादी : बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी होते. हिंदुत्व हा त्यांचा खरा पिंड होता. बाबरी प्रकरण आणि नंतर मुंबईतल्या धार्मिक दंगली या गोष्टी तर अजूनच घातक आहेत. 'हो, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे.' हे छातीठोकपणे बोलणारे बाळासाहेब ठाकरे एकमेव नेते होते. 'हटाव लुंगी बजाव पुंगी' म्हणत दक्षिण भारतीय लोकांना त्यांनी केलेला विरोध हा फक्त राजकीय भावनेने प्रेरित नसून आणि त्यात त्यांनी मराठी लोकांनी उद्योगधंद्याला पुढे येण्यासाठी केलेली धडपड होती. हिंदुत्व मराठी माणूस हे त्यांचे पहिले समीकरण होते.
शिवसेनेची अवहेलना : बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची कमान हाती घेतली. बाळासाहेब हयात नसल्याने भाजपकडून शिवसेनेला खालसा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. २०१४ मध्ये सत्तेवर युती सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपकडून दिल्या गेलेल्या वागणुकीवर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण सर्वश्रुत आहे. पुढे २०१९ च्या निवडणुकीनंतर वरचढ ठरलेल्या शिवसेनेला डावलण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासोबत मनोमिलन केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत भाजपला जागा दाखवली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडली, असा आरोप यानंतर भाजपने सुरु केला. मात्र, अडीच वर्षात शिवसेनेत दोन गट झाले.
शिवसेनेतील एकजुटीला छेद : शिवसेनेतून फुटून वेगळा गट निर्माण झालेल्या शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा निशाणा साधला जातो आहे. मात्र, ज्या पद्धतीने केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपने शिवसेनेची अवहेलना केली, ती बाळासाहेबांना रुचली असती का? हा प्रश्न आहे. पुढे जाऊन विचार केल्यास, हिंदुत्ववादी विचारांमध्ये शिवसेना देशात भाजपला अडसर ठरत होती. देशभरात उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेचा परिणाम जाणवू लागला होता. परराज्यात झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत शिवसेनेने सपाटून मार खाल्ला असला तरी भाजपच्या असंख्य जागा शेकडोच्या फरकाने आल्या आहेत. शिवसेना एकसंध राहिल्यास भविष्यात धोका निर्माण होईल. त्यामुळे शिवसेनेतील एकजुटीला छेद देऊन देशात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून नंबर एक ठेवण्याचा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर झाल्याची चर्चा बोलले गेले होते. शिवसेनेतील फुटीनंतर या वृत्ताला दुजोरा मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शिवसैनिकांचे कुटुंब उघड्यावर येतील : बाळासाहेब ठाकरे यांचा आज १० स्मृतीदिन आहे. मात्र, मुळ शिवसेना आज अस्तिवात नाही. शिवसेनेच्या नावाचे विभाजन झाले आहे. बाळासाहेबांनी निवडलेले धनुष्यबाण चिन्ह गोठवला गेला आहे. नेत्यांच्या वादामुळे बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांमध्ये दरी निर्माण झाली आहे. एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले सुरू आहेत. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना हा प्रकार भुषावणारा नाही. बाळासाहेबांनी आपल्या कारकिर्दीत राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांशी शेवटपर्यंत संबंध जोपासले. मात्र, आज त्यांचे अनुकरण करणाऱ्या चेल्यानी हाच गुण अंगिकारेने गरजेचे आहे. परंतु, सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांच्या त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. सोशल मीडियावरून या संदर्भातील संभाषण देखील अनेकदा व्हायरल झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेऊन हा प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे. अन्यथा, सत्तेच्या नादात आपल्याच बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचे कुटुंब उघड्यावर यायला वेळ लागणार नाही.