मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रमुख म्हणून काम करणाऱ्या अधिष्ठातांना रुग्णसेवेसोबत प्रशासकीय काम करावे लागते. यामुळे रुग्णसेवेकडे दुर्लक्ष होते. यासाठी अधिष्ठाता यांच्याकडून प्रशासकीय भार काढून ते काम अभियंत्यांवर दिले जाणार आहे. अधिष्ठात्यांना रुग्णसेवेवर जास्त लक्ष केंद्रित करता यावे यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
यामुळे निर्णय रखडला - मुंबई महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयात असलेल्या अधिष्ठाता या पदावरील डॉक्टरांना प्रशासकीय कामात जुंपले जाते. यामुळे वैद्यकीय सेवेकडे त्यांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे रुग्णलयातील सर्व प्रशासकीय कामे करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नेमण्याचा सर्वप्रथम निर्णय तत्कालिन महापालिका आयुक्तांनी सन २०१९ मध्ये घेतला होता. त्यानुसार सहायक आयुक्त किरण दिघावकर, प्रशांत सपकाळे आणि तत्कालिन सहायक आयुक्त देवीदास क्षिरसागर यांची केईएम, शीव, नायर आणि कुपर रुग्णालयांच्या ‘सीईओ’पदी नेमणूक करण्यात आली होती. परंतु, सहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागाचे काम करण्यासाठी वेळ कमी पडतो. मग ते रुग्णालयाचे कामकाज कसे बघणार असा प्रश्न उपस्थित करत नगरसेवकांनी विरोध केला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
अभियंत्यांची नियुक्ती होणार - कोरोनामुळे रुग्णालयांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी नेमणुक करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. आता पुन्हा एकदा पालिकेने केईएम, नायर, सायन आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रशासकीय कामांकरता सीईओ नेमण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. रुग्णालयाच्या कामकाजाकडे अधिष्ठाता तसेच सहाय्यक आयुक्तांना लक्ष देणे शक्य नसल्याने आता पालिका अभियंत्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.