मुंबई - पांडवकडा धबधब्याच्या ओढ्यात शनिवारी(दि. 3 ऑगस्ट) सकाळी वाहून गेलेल्या चार तरुणींपैकी चौथ्या तरुणीचा मृतदेह तब्बल 48 तासानंतर सापडला आहे. बेलापूरच्या खाडीत नेहा दामा(वय २०) हिचा मृतदेह सापडला असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली आहे.
गेल्या शनिवारी प्रवेशबंदी असतानाही पांडवकडा धबधब्यावर गेलेल्या चार तरुणी वाहून गेल्या होत्या. यापैकी 3 मुलींचे मृतदेह सापडले होते. तर, 1 तरुणी बेपत्ता होती. अवघड ओढ्यात ड्रोनच्या साहाय्याने तपास करूनही तरुणीचा शोध लागू शकला नव्हता. घटनास्थळी पोहचण्यासाठी पायी जावे लागत होते. शनिवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तरुणींचा शोध घेण्यास अडथळे येत होते. अग्निशमन दलाची गाडीही चिखलात काही वेळ अडकली होती. शनिवारी दिवसभर शोध घेतल्यानंतर सायंकाळी शोधमोहीम थांबवण्यात आली होती. रविवारी पुन्हा सकाळी ९ वाजता ही मोहीम सुरू करण्यात आली. ड्रोनची मदत घेऊन पोलिसांनी डोंगरात वाहत येणाऱ्या खाचखळ्यात तरुणी अडकली आहे का, याचा अंदाज घेतला. खारघर शहरातून वाहत जाणाऱ्या ओढ्यातही शोध घेण्यात आला होता. मात्र तरुणीचा तपास लागला नाही. आज बेलापूरच्या खाडीत नेहा हिचा मृतदेह सापडला असल्याची माहिती एन. आर.आय. पोलिसांनी दिली. धबधब्यावर पाण्याचा प्रवाह जोर जास्त असल्याने नेहा हिचा मृतदेह वाहून बेलापूरच्या खाडीत आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
खारघर आणि बेलापूरदरम्यान खाली पावसाचे पाणी पडत असल्याने नैसर्गिक धबधबा तयार झाला आहे. त्यालाच 'पांडवकडा' संबोधले जाते. निसर्गाचे मोहक रुप अनुभवण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड परीसरातील पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात. मात्र, अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांना त्यांचा जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.