मुंबई - दहा दिवसांपूर्वी वडाळा येथे राहणाऱ्या अंकुश सरवदे या युवकाचा अपघात झाला. काल शनिवारी त्याचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृतदेह रुग्णालयाने इतर लोकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली. यामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ केला असून सायन रुग्णालयाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पेशाने डान्सर असलेला अंकुश गौतम सरवदे याचा दहा दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना अंकुशचा काल शनिवारी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबीय व नातेवाईक सकाळी रुग्णालयात गेले असता त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. मृतदेह दिला जात नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तगादा लावला असता दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आल्याचे समोर आले. अंकुशच्या मृतदेहावर दुसऱ्याच रुग्णाच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. मृतदेह बंद करून देण्यात आल्याने चेहरा न बघताच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे दुसऱ्या रुग्णाच्या कुटुंबीयांनी अंकुशच्या कुटुंबीयांना सांगितले.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग : आजही २२ हजारांहून अधिक नवे रुग्ण
सायन रुग्णालयातून मृतदेहाची अदलाबदल झाल्याने अंकुशच्या नातेवाईकांना तसेच वडाळा विभागातील नागरिकांनी सायन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी गर्दी केली आहे. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान अंकुशच्या कुटुंबीयांकडून सायन रुग्णालयाविरोधात मृतदेह अदलाबदल झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत सायन रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकलेला नाही.