मुंबई : नाशिक येथील एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रात विद्युत विनिमय संदर्भात सोयी सुविधा उपलब्ध नसण्याबाबतची लक्षवेधी आमदार सरोज अहिरे यांनी उपस्थित केली होती. या लक्षवेधी दरम्यान चर्चा करीत असताना आमदार बच्चू कडू यांनी कामगार वसाहती संदर्भातील प्रश्न उपस्थित केले. तसेच कामगारांची अवस्था लग्न एकाने लावून द्यायचे आणि दुसऱ्याने तोडायचे, अशी झाली असल्याचे उदाहरण आमदार कडू यांनी दिले.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री? : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात उत्तर देताना सांगितले की, बच्चू कडू यांनी हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून विचारला आहे का? लग्नाचे उदाहरण देताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे का पाहिले? आम्ही आदित्य ठाकरेंचेही लग्न जमवू, अशी मिश्किल टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांचा स्वानुभव : माजी मंंत्री आदित्य ठाकरे यांनी सभागृहात या मुद्द्यावर बोलताना म्हटले की, अध्यक्ष महोदय ही नवीन राजकीय धमकी आहे का? आमच्याकडे या नाहीतर लग्न लावून देऊ? यावर उपमुख्यमंत्री यांनी पुन्हा आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, लग्न लावून देण्यामागचा उद्देश हा आहे की, लग्नानंतर संबंधित व्यक्ती फार बोलत नाही. एखाद्याचे तोंड बंद करायचे असेल तर हा उपाय आहे आणि हे मी स्वानुभवावरून सांगतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात जोरदार हशा पिकला होता.
आमदार जाधवांचा बहिष्कार : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आतापर्यंत नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भास्कर जाधव हे सातत्याने नाराज दिसले. राज्य सरकार त्यांचा आवाज जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप करत आमदार भास्कर जाधव यांनी आता अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. जाधव पुढे म्हणाले की, विदर्भ तसेच मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात असतो. निसर्ग कोपल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सभागृहात मी पुन्हा आता येणार नाही कारण मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिलं जात नाही आहे. हे सभागृह घटनेने चालावे, अशी अपेक्षा असते. परंतु, कामकाजातून मला बाहेर ठेवले जात असल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला.