मुंबई Dating App Scams : व्हिडिओ चॅट दरम्यान रेकॉडिंग केलेले अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वेब सिरीजच्या सहाय्यक दिग्दर्शकाला ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी करून खंडणी वसुली करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (blackmailing for money) याप्रकरणी या सहाय्यक दिग्दर्शकाच्या तक्रार अर्जावरून मालवणी पोलिसांनी चौघांविरुद्ध खंडणीसाठी धमकी देणे आणि माहिती व तंत्रज्ञान ॲक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांच्या मदतीने तपास करत असल्याची माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली आहे.
सायबर सेलकडून समांतर तपास : मालाडच्या मार्वे रोड परिसरात तक्रारदार त्यांच्या बहिणीसोबत राहत असून ते वेब सिरीजसाठी सहाय्यक दिग्दर्शन आणि त्यांची बहिण कथालेखन करते. त्यांनी आतापर्यंत अनेक वेब सिरीजमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
तिने त्याचा न्यूड व्हिडिओ केला रेकॉर्ड : गेल्या आठवड्यात पीडित व्यक्तीने एक डेटिंग अॅप मोबाईलवर डाऊनलोड केले होते. या अॅपच्या माध्यमातून त्यांची एका महिलेशी ओळख झाली होती. या महिलेच्या ओळखीनंतर ते दोघेही चॅटवरून एकमेकांच्या संपर्कात होते. व्हिडिओ कॉलदरम्यान तिने त्यांना सर्व कपडे काढण्यास सांगितले होते. त्यामुळे सहाय्यक दिग्दर्शकाने सर्व कपडे काढले. त्यादरम्यान तिने व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : काही वेळ चॅटिंग केल्यानंतर या दोघांनी दुसर्या दिवशी भेटण्याचं ठरवलं होतं. दुसर्या दिवशी त्यांना एका अज्ञात मोबाईलवरून मॅसेज आला होता. त्यात त्यांचे सदर महिलेसोबत अश्लील व्हिडिओ पाठवले होते. ते व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याने एका बँकेचा अकाऊंट क्रमांक दिला होता. या अकाऊंटमध्ये 75 हजार ट्रान्सफर केले नाहीतर त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
अखेर पोलिसात तक्रार दाखल : बदनामीच्या भीतीने पीडित दिग्दर्शकाने अज्ञात व्यक्तीच्या बँक खात्यात 35 हजार रुपये पाठवून दिले. मात्र ही रक्कम दिल्यानंतरही तो त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरून ब्लॅकमेल करून धमकी देत होता. त्यामुळे त्यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित 4 आरोपींविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध खंडणीसाठी धमकी देणे आणि माहिती व तंत्रज्ञान ॲक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
हेही वाचा: