मुंबई - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी संकट येऊन उभे ठाकले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करत आहे. हे वादळ आज (3 जून) अलिबागला धडकून दुपारी मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. या वादळाचा फटका अलिबाग, रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रात्री दीड ते ते पहाटे साडेसहा वाजेपर्यंत वादळाचा प्रवास मुंबईच्या दिशेने निश्चित होत आहे. मुंबईतील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर पोलीस सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून नागरिकांना समुद्रकिनार्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची चिंता असून प्रशासन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. नवी मुंबई मध्येच सोसाट्याचा वारा वाहील तसेच मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या चक्रीवादळाच्या काळात प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. प्रशासनाने केलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावे. खबरदारी म्हणून सुरक्षित स्थळी स्थलातंरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते.
हेही वाचा - Nisarga Cyclone : चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज, दोन दिवस घराबाहेर पडू नका - मुख्यमंत्री
हेही वाचा - निसर्ग चक्रीवादळ : मुंबईसह कोकणात एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात