मुंबई - मुंबई सायबर सेल सेलने फोन टॅपिंग प्रकरणात ( Phone Tapping Case ) मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांचे जवाब नोंदवण्यात करिता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA न्यायालयात मंगळवारी (दि. 15 जून) धाव घेतली आहे. सायबर सेलकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला असून नवाब मलिक यांची यासंदर्भात चौकशी करण्याची यासाठी परवानगी मागितली आहे.
बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी विशेष न्यायालयात अर्ज केला. या प्रकरणी सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दक्षिण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांना आरोपी करण्यात आलेले नाही. पण, त्यांनीच बेकायदा फोन टॅप केल्याचा आणि राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना पोलिसांच्या बदल्यांमधील कथित भ्रष्टाचाराचा गोपनीय अहवाल उघड केल्याचा आरोप आहे.
सायबर पोलिसांनी मंगळवारी विशेष न्यायालयात अर्ज करून मलिक यांची फोन टॅपिंगप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. फोन टॅपिंगशी संबंधित कागदपत्रांचा एक संच मलिक यांच्याकडे होता. याच कागदपत्रांचा संचात शुक्ला यांनी कथितरित्या उघड केल्याचा आरोप आहे. त्यामुळे मलिक यांची चौकशी करायची असून त्यासाठी परवानगी देण्याची मागणी सायबर पोलिसांनी केली आहे.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात यापूर्वीही आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबईतील कुलाबा आणि पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. आतापर्यंत फोन टॅपिंग प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅपिंग केल्या प्रकरणात जबाब बदलून देण्यात आलेला आहे. तसेच रश्मी शुक्ला यांचाही मुंबई, पुणे पोलिसांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार जवाब नोंदवण्यात आलेला आहे.