मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागाने सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी 6 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. कस्टम विभागाने या नागरिकांकडून सुमारे 1. 98 कोटी रुपये किमतीच्या 3.7 किलोग्राम सोन्याची पावडर जप्त केली आहे. एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रवाशांनी शरीरात सोने लपवून ठेवले होते.
अशा प्रकारे सापडले सोने : कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या प्रोफाइलिंगच्या आधारे त्यांच्या शरीरात काही वस्तू असल्याचे समजले. त्यांच्या तपासणीत त्यांनी त्यांच्या शरीरात सोन्याची तस्करी केल्याचे उघड झाले आहे.हे सर्व सहा प्रवासी एकाच सोन्याच्या तस्करी करणाऱ्या कार्टेलमधून जोडलेले आहेत का, त्यांना हे सोने कोणी सुपूर्द केले आणि ही खेप कोणाला मिळणार होती, याचा कस्टम आता तपास करत आहे. या प्रकरणी बोलताना एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, बहुतेक प्रकरणांमध्ये आम्ही, असे निरीक्षण केले आहे की, प्रवासी तस्करीत गुंतण्यासाठी वाहक म्हणून काम करतात. त्यांना तस्करांकडून एकतर मोफत परदेशी सहली किंवा पैसे देण्याचे आश्वासन दिले जाते.
आधीही एका तस्कराला अटक : 18 मे रोजी विमानतळ सीमा शुल्क विभागाने (कस्टम) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिहारमधील एका 39 वर्षीय व्यक्तीला दुबईमधून 2.28 कोटी रुपयांच्या 4.265 किलोग्राम सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली होती. प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्या अंडरवेअरमध्ये जीन्सच्या शिलाईच्या खिशात आणि गुडघ्याखाली लपवून ठेवलेले मेणाच्या स्वरूपात सोन्याच्या पावडरची 9 पॅकेट सापडले.
आधीही एका तस्कराने गिळले होते सोने : दोन आठवड्यांपूर्वी कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका 30 वर्षीय सोने तस्कराला अटक केली होती. या तस्कराने प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेले 8 गोल्ड बार गिळले होते. सोने गिळल्यामुळे त्याची तब्यत बिघडली होती. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. डॉक्टरांनी जेव्हा एक्सरे काढला तेव्हा आरोपीच्या पोटात 3 ते 5 सेंटीमीटर लांबीचे बार आढळून आले होते. हे बिस्किटे आतडींमध्ये अडकले होते.
हेही वाचा -