नवी मुंबई - महावितरणच्या नेरूळ विभागाने एका उच्चभ्रू सोसायटीमधील घरगुती ग्राहकाने केलेली वीज चोरी पकडली आहे. नेरूळ सेक्टर 1 मधील ट्वीनलँड टॉवरमधील एका घरातील एअर कंडीशनसाठी जवळपास सात लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबतची माहिती एका जागरूक ग्राहकाने भांडुप नागरी परिमंडळाच्या मुख्य अभियंत्याना दिली होती. त्यानंतर वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड व पामबीच उपविभाग पथकाने ही कारवाई केली आहे. ट्वीनलँड टॉवरममध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या व आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या तरपन अमिन या व्यावसायिकाने हा वीज चोरीचा पराक्रम केला आहे.
हेही वाचा - वीज चोरी प्रकरणी पॉवरलूम मालकाला 5 लाखांच्या दंडाची शिक्षा, ठाणे न्यायालयाचा निर्णय
वीजचोरी करणाऱ्या व्यक्तीच्या घरात विविध प्रकारची विदेशी जातीची कुत्रे आहेत. या कुत्र्यांना २४ तास वातानुकूलित यंत्रणा लागत असल्याने ही वीज चोरी केल्याचे ग्राहकाने कबूल केले आहे. या ग्राहकावर विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकाने एकूण ३४ हजार ४६५ युनिट वीज चोरी करून महावितरण कंपनीचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान केले होते. ही रक्कम ग्राहकाने दंडासहीत भरली आहे. उच्चभ्रू वस्तीत वीज चोरी केल्याची ही दुर्मीळ घटना उघडकीस आल्याने परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. ग्राहक वीजचोरी बाबत जागरूक झाल्याचेही या घटनेतून समोर आले आहे. ग्राहकांनी वीज चोरी केल्यास येथून पुढेही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जागरूक ग्राहकांनी वीजचोरीबाबत महावितरण प्रशासनला माहिती द्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी केले आहे.
हेही वाचा - लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी राखीव उद्यानात राजकीय पक्षांचा कार्यक्रम..