मुंबई- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. भारतात सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनसह संचारबंदी लागू आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासन वारंवार आवाहन करीत आहे. मात्र, नागरिक आवाहनाची पायमल्ली करीत रस्त्यावर पडत आहेत. अशा नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहे. लाॅकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये पुण्यातील नागरिकांचा अव्वल क्रमांक आहे. त्यामुळे पुण्यात सर्वांत जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा.
52 हजार 555 वाहने जप्त...
राज्याभरात 22 मार्च ते 4 मे या काळात 93 हजार 731 गुन्हे दाखल झाले असून 18 हजार 466 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 633 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 181 घटना घडल्या असून या प्रकरणी 661 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या 100 या नियंत्रण नंबर वर आतापर्यंत 84 हजार 22 फोन आले आहेत. अवैद्य वाहतूक संदर्भात 1 हजार 270 गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल 52 हजार 555 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
सर्वाधिक व सर्वात कमी गुन्हे-
लॉकडाऊन काळात राज्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद पुणे शहरात असून तब्बल १५ हजार ८६ आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ मुंबईत १० हजार ५५४, अहमदनगर ९ हजार ४६, पिंपरी-चिंचवड ७ हजार ५१९, आणि पुणे ग्रामीणमध्ये ५ हजार ६९३ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सर्वात कमी गुन्हे वर्धा १५७, नंदुरबार ११०, गडचिरोली ९०, रत्नागिरी ७५, आणि अकोला ७२ दाखल झाले आहेत.
418 पोलिसांना कोरोनाची लागण...
कोरोना व्हायरसचे संक्रमन थांबविण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात असताना एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 418 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे असून आतापर्यंत 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयात 40 पोलीस अधिकारी व 378 पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- कोरोना : तेलंगाना राज्यातील लॉकडाऊन 29 मेपर्यंत वाढवला