मुंबई Cricket World Cup 2023 : २००३ साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. आता २० वर्षानंतर पुन्हा एकदा हे दोन संघ विजेतेपदाच्या मुकाबल्यात आमने-सामने आले आहेत.
चाहत्यांची उत्कंठा शिगेला : रविवार, १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी देशभरातल्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मुंबईतील क्रिकेट चाहते सुद्धा या सामन्याचा आनंद घेण्यासाठी पूर्णपणे तयार झाले आहेत. काही जणांनी मित्रांबरोबर हॉटेल, पब, स्पोर्ट्स बार, मॉल आणि रिसॉर्टवर जाऊन सामन्याचा आनंद घेण्याची तयारी केली. तर अनेकांनी घरीच कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत मॅचचा आनंद घेण्याचा बेत आखलाय.
मोठ्या स्क्रीनवर मॅच बघायला पसंती : बुधवारी, १५ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. मुंबईकरांनी या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला होता. हा सामना पाहण्यासाठी मुंबईतील रेस्टॉरंट, बार, स्पोर्ट्स बार, मॉल तसेच आसपासचे रिसॉर्ट फुल झाले होते. आत मुंबईत अनेक मोकळे मैदानं, क्लब तसेच गृहसंकुलामध्ये मोठ्या पडद्यावर अंतिम सामना पाहिला जाणार आहे. याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातूनही सामन्याचं लाईव्ह स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.
होम डिलिव्हरीमध्ये वाढ : फायनलच्या दिवशी हॉटेल व्यवसाय सुद्धा जोरात असणार आहे. रविवारी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येईल. दुपारपासून ते मॅच संपेपर्यंत मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये मोठी गर्दी दिसेल, असं इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे सरचिटणीस सुधाकर शेट्टी यांनी सांगितलं. त्याचबरोबर रविवारी होम डिलिव्हरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरला झालेल्या भारत-न्यूझीलंड उपांत्य सामन्यादरम्यान होम डिलिव्हरीमध्ये अंदाजे १५ ते २० टक्के वाढ झाली होती. आता अंतिम सामन्याच्या दिवशी हे प्रमाण २५ ते ३० टक्क्यावर जाऊ शकतं, असं शेट्टी यांनी सांगितलं.
घरी सहकुटुंबासोबत मॅच बघायला पसंती : अनेकांनी हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार, स्पोर्ट्स बार, रिसॉर्ट येथे जाऊन मॅचचा आनंद लुटण्याचं ठरवलं असलं तरीसुद्धा असे अनेक मुंबईकर आहेत, ज्यांनी कुटुंबासमवेत किंवा मित्रांसमवेत घरीच या मॅचचा आनंद लुटण्याचा बेत आखला आहे. याबाबत बोलताना विघ्नेश सावंत हा युवा क्रिकेट प्रेमी सांगतो की, आम्ही सर्वांनी घरच्यांनी एकत्र येऊन मॅचचा आनंद लुटण्याचं ठरवलं आहे. याचं कारण म्हणजे रविवारी बाहेर सर्वच ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असणार आहे. त्यातच घरातील सर्वजण क्रिकेटचे चाहते असून प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. मला विराट कोहली आवडतो तर माझ्या भावाला सूर्यकुमार यादव आवडतो. तर मॅचच्या अनुषंगाने यावर फार चर्चाही होते. अशामध्ये घरात बसून सहकुटुंब, मित्रांसोबत मॅचचा आनंद घेण्याची मजाच काही निराळी असते.
हेही वाचा :