पुणे - राज्यात ८ जूनपासून कात्रज दूध संघ वगळता इतर दूध संघातील गाईच्या दूध दरात २ रुपयांची वाढ होणार आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घटत असलेले रोजचे दूधसंकलन, गाईच्या दुधाच्या खरेदी दरात एक जूनपासून करण्यात आलेली वाढ आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच ४४ रुपये किंमतीपेक्षा जादा दरवाढ करू नये, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे केवळ कात्रज दूध संघाच्या गायीच्या दुधाचा दर ४२ रुपये राहणार आहे. त्याचवेळी इतर दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिकांच्या उत्पादनाचा दर ४४ रुपये इतका राहणार आहे. राज्यातील १७० दूध प्रकल्प या संस्थेचे सभासद आहेत. दुधा संबंधित कोणत्याही प्रश्नावर सरकारबरोबर चर्चा, वाटाघाटी करण्यासाठी संघाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आणि पाण्याची टंचाई यामुळे दुधाचे रोजचे संकलन घटत आहे. राज्य सरकारचे दूध अनुदानही बंद झाले आहे. त्यामुळे तातडीने शासनाने पुढील ३ महिन्यांकरीता प्रतिलिटर २५ अधिक ५ रुपये अनुदान द्यावे, तसेच गाईच्या दुधास प्रतिलिटर ३० रुपये दर शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रजच्या दूध दरात ८ जूनपासून कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही, असे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी सांगितले.