मुंबई - आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संपूर्ण मुंबईतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही तांत्रिक कारणांनी वीज पुरवठा खंडित झाला असताना आणि वीज येण्यास बराच काळ लागणार आहे. अशा स्थितीत कोविड सेंटरमधील रुग्णसेवेचे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण कोविडसाठी नेमलेल्या प्रशासनाने कोविड सेंटरमध्ये सर्व रुग्णसेवा सुरळीत असल्याची माहिती दिली आहे. वीज गेल्याबरोबर जनरेटरची सुविधा सुरू करण्यात आली असून 8 ते 12 तास पुरेल इतका बॅकअप असल्याचे सेंटरकडून सांगण्यात आले आहे.
बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी, बीकेसी कोविड सेंटरमध्ये जनरेटरची सोय असून येथे 12 तास याद्वारे वीजपुरवठा होऊ शकतो, अशी माहिती दिली आहे. तर, 500 लिटर डिझेलही उपलब्ध आहे. तेव्हा वीज गेल्याबरोबर जनरेटर सुरू करण्यात आले असून रुग्णसेवा सुरळीत सुरू आहे, असे त्यांनी सांगितलं.
गोरेगाव नेस्को सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आधार्डे यांनी, कोविड सेंटरमध्ये 2 जनरेटर असल्याची माहिती दिली आहे. वॉर्डसाठी वेगळा तर आयसीयूसाठी वेगळा जनरेटर आहे. या जनरेटरची क्षमता 8 तासांची आहे. त्यामुळे नेस्कोमध्ये कोणतीही अडचण वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे निर्माण झाली नसल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - LIVE : मुंबईतील वीज पुरवठा विस्कळीत
हेही वाचा - मुंबईत वीजपुरवठा थांबल्याने लोकल सेवा ठप्प, पाहा प्रवाशांच्या प्रतिक्रिया