मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. आज रविवारी दिवसभरात धारावीत ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. धारावी प्रमाणेच दादरमध्ये १०२ तर माहिममध्ये ८७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६० ते ७० वर घसरलेली संख्या ४३९ वर पोहचली आहे. दादरमध्ये ६१८ तर माहिममध्ये ७५१ अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
धारावीत ४३९ अॅक्टिव्ह रुग्ण -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार, अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या आता ६ हजार ९२३ वर पोहचली आहे. धारावीतही काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. धारावीत ८ मार्चला दिवसभरात १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. आज धारावीत ७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण ४ हजार ७७० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४ हजार १४ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
माहिममध्ये ७५१ सक्रिय रुग्ण -
मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाच्या हद्दीत धारावी, दादर, माहीम हे विभाग येतात. धारावी प्रमाणेच दादर आणि माहिममध्येही रुग्णसंख्या वाढत आहे. दादरमध्ये आतापर्यंत ५ हजार ८५३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५ हजार ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये आतापर्यंत ५ हजार ९३६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ५ हजार ३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ७५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -
मुंबईत गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. दाटीवाटीने असलेली घरे, सार्वजनिक शौचालय यामुळे धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. धारावीत १ एप्रिलला पहिला रुग्ण आढळून आल्यापासून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या चार टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. जुलै ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एक अंकावर आली होती. २४ डिसेंबर, २२ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी, २ फेब्रुबारी या सहा दिवसात धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सज्ज, लोकलमधील प्रवाशांना फुगे न मारण्याचे आवाहन
हेही वाचा - Corona Vaccination : राज्यात लसीकरणाला वेग, आतापर्यंत 57 लाख 62 हजार लाभार्थ्यांना लस