मुंबई - कोरोना विषाणुमुळे संपूर्ण संचारबंदी असतानाही या लॉकडाऊनमध्येही एक अनोखे असे लग्न पार पडले आहे. तेही मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात. एकीकडे वरळी कोळीवाडा परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत तर दुसरीकडे याच परिसरात अनोखे लग्न करून एका जोडप्याने नवीन आदर्श उभा केला आहे. ना नातेवाईक, ना मंडप, ना धामधूम, ना सनईचा सूर अगदी घरातल्या घरात चार भिंतींमध्ये अगदी साधेपणाने सोशल डिस्टन्सिंग पाळत एक तरुण जोडपे विवाहबद्ध झाले आहे.
वरळी कोळीवाड्यात राहणारी 25 वर्षीय तरुणी व प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने सर्व चालीरिती खर्चाला फाटा देत विवाहबद्ध होत एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला आहे. ऐश्वर्या घनश्याम हिलटी व तिचे 27 वर्षीय पती संजय चौरसिया हे दोघेही आज सकाळी एका अनोख्या पद्धतीने विवाहबद्ध झाले आहेत. दोघेही एका खासगी बँकेत उच्च पदावर कार्यरत आहेत.
एकमेकांवर प्रेम असलेल्या दोघांचे घरच्यांच्या परवानगीने आजच्या दिवशी 16 एप्रिल रोजी लग्न ठरलेले. महिन्याभरापूर्वी संपूर्ण लग्नाची खरेदी व तयारी झालेली. अचानक कोरोना व्हायरसने भारतातही डोके वर काढले आणि आपल्याकडेही लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागणार अशी चिंता घरच्यांसह सर्व नातेवाईकांना लागलेली. मात्र, ठरलेल्याच दिवशी दोघांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत घरातल्या घरी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ऐश्वर्याचे वडील गेले 13 वर्षे वारी करत असून ते वारकरी आहेत. त्यामुळे आपल्या मुलीचे मंगलाष्टकदेखील वडील घनश्याम चौधरी यांनी म्हणत आपल्या मोठया मुलीचे लग्न लावले. या अनोख्या लग्नाला होते अवघे पाच जण, स्वतः वधू ऐश्वर्या, तिचे आई वडील, लहान बहीण व वर मुलगा. या लग्नाला नातेवाईकांनी हजेरी लावली तेही सोशल मीडियाच्या झूमवरून. झूमवरून सर्व नातेवाईक या अनोख्या लग्नाचे साक्षीदार झाले आणि या नवदाम्पत्याला झूमवरूनच अक्षता टाकून नवीन वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.
मी राहत असलेल्या चाळीत कोरोना रुग्ण नव्हता, मात्र आमचा भागही सील केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वीच क्वारंटाईन केलेल्या रहिवाशांनाही घरी सोडण्यात आले. मात्र, लग्न लागताना एकही शेजारी चाळकऱ्यांनी घरी डोकावले नाही. स्वतःच्या घरात राहूनच सर्वांनी टाळ्या वाजवून आम्हाला शुभ आशीर्वाद दिलेत. लॉकडाऊनमध्ये पार पडलेले लग्न मला खूपच आवडले आहे. एकप्रकारे आम्ही सर्व चालिरीती खर्चाला फाटा देत एकप्रकारे युनिक लग्न केल्याची प्रतिक्रिया वधू ऐश्वर्या संजय चौरसियाने ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.