मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती देश सुरक्षित आहे. जे ५० वर्षात जमले नाही ते मोदींनी ५ वर्षात करून दाखवले. त्यामुळे देश पुन्हा सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी यांना पुन्हा निवडून आणा, असे आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज मुंबईत केले. तसेच मोदी सरकारने पाकिस्तानच्या विरोधात २ सर्जिकल स्ट्राईक केले. आता देशातील जनता येत्या निवडणुकीत मोदी विरोधकांचे तिसरे सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचे सांगत स्वराज यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
शीव येथील षण्मुखानंद सभागृहात भाजपच्या महिला मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, किरीट सोमय्या, राहुल शेवाळे यांच्यासह मंत्री विद्या ठाकूर तसेच भाजपच्या महिला आमदार आणि नगरसेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
स्वराज यांनी भाषणात मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात कोण-कोणत्या योजना राबविल्या याची माहिती देत त्याचा गाजावाजा केला. त्या म्हणाल्या की, मागील ५० वर्षात ज्यांना देशातील महिला, सर्वसामान्य जनतेसाठी काही करता आले नाही ते केवळ मोदींनी ५ वर्षात केले. मोदी यांची विकास गाथा मोठी आहे. सर्व समाजासाठी त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे. देश आता निवडणुकीच्या रंगात येत आहे. त्यामुळे आता महिलांनी प्रचाराची जबाबदारी घेत मोदींना पुन्हा सत्तेवर आणावे, असे त्यांनी आवाहन केले.
मोदींनी आजन्म मुलींपासून ते म्हाताऱ्या महिलेपर्यंत गांभीर्याने विचार केला. देशात २ वेळा देवीची आराधना केली जाते. देवीची आराधना ही ९-९ अशी १८ दिवस होते. परंतु राम जन्म आणि इतर सण एकच दिवस होतात. त्याच देवीची हत्या ही गर्भात होत होती. ती मोदी सरकारने थांबवली. गर्भात मुली मारल्या जातात ही विटंबना आहे.
आज हरियाणात मुली मिळत नाहीत याचा मला खेद वाटतोय. मात्र, मोदी सरकारनंतर परिस्थिती बदलत आहे. सरकारी कार्यक्रम यापूर्वी बनवले होते. परंतु, त्यावर काम झाले नाही. मोदींनी 'बेटी बचाव बेटी पढाव' अभियान राबवले. त्यामुळे हरियाणात आज मुलींचे प्रमाण वाढले आहे. आज मुलींना जगण्याचा अधिकार मोदींनी दिला. सुकन्या समृद्धी योजना सरकारने आणून त्यावर ८.५० टक्के व्याज मिळवून दिले. त्यामुळे आज देशात महिला सन्मानाने उभ्या राहत असून त्यामागे मोदी यांची दूरदृष्टी असल्याचेही त्या म्हणाल्या.