मुंबई - दिवाळीच्या काळात अर्थात मागील पाच दिवसांत मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. काल (16 नोव्हेंबर) मुंबईत 409 रुग्ण आढळून आले. इतक्या कमी संख्येने रुग्ण आढळल्याने अनेक जण आनंदी असतील. पण, मुळात मागील पाच-सहा दिवसात कोरोना चाचण्याची संख्या कमी झाल्याने रुग्णांची संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. तर आता मुंबई महानगर पालिकेनेही चाचण्या कमी झाल्याचे मान्य केले आहे. उद्यापासून (दि. 18 नोव्हेंबर) कोरोनाच्या चाचण्या वाढतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
तज्ज्ञांकडून चिंता
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची कमी झाली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र कोरोनाच्या चाचण्या कमी झाल्याने रुग्ण कमी झाल्याची चर्चा आहे. तर पालिकेकडून कोरोना चाचण्या कमी करण्यात आल्याचाही आरोप होत आहे. तर टास्क फोर्स असो वा कोविडसाठी काम करणारे तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून ही चाचण्या कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असल्याची चर्चा आहे. तर त्यांनी त्वरित कोरोना चाचण्या वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे चाचण्या कमी होणे ही चांगली बाब नसून चाचण्या वाढवणे आता गरजेचे आहे.
यामुळे चाचण्या कमी
काकाणी यांनी दिवाळीच्या आठवड्यात कोरोना चाचण्या कमी झाल्याची कबुली काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. दिवाळी आधी दिवसाला 12 ते 14 हजार कोरोना चाचण्या मुंबईत होत होत्या. पण, दिवाळीच्या पाच-सहा दिवसांत चाचण्या कमी झाल्या आहेत. चाचण्यांचा आकडा 12 ते 14 हजारांहून 10 हजारांच्या खाली गेला आहे. दिवाळीच्या एका दिवशी तर मुंबईत केवळ 5 हजार चाचण्या झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पण, या चाचण्या पालिकेकडून कमी करण्यात आलेल्या नाहीत. तर नागरिक दिवाळीत चाचण्या करण्यासाठी पूढे आलेले नाहीत. नेमके नागरिक कॊरोना चाचण्यासाठी का पुढे येत नाहीत हे सांगता येत नाही. पण केवळ नागरिक चाचण्यासाठी पुढे न आल्याने चाचण्या कमी झाल्याचा पुनरुच्चार काकाणी यांनी केला आहे.
आता पुन्हा चाचण्या वाढतील
मुळात कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेत त्यांच्या चाचण्या घेतल्या जातात. तर ज्यांना लक्षणे आहेत ते चाचण्यांसाठी पुढे येतात. अशावेळी मुंबईत नोव्हेंबरमध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्याने संपर्कातील नागरिकांची ही संख्या कमी झाल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी दिवाळीत मात्र चाचण्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. हे नक्कीच चिंताजनक आहे. पण, आता मात्र चाचण्या वाढणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे. उद्यापासून चाचण्या वाढवल्या जातील 10 हजारांच्या खाली आलेला चाचण्यांचा आकडा पुन्हा 12 ते 14 हजारावर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या चाचण्या जितक्या जास्त होतील तितके रुग्ण अधिक आढळून त्यांना त्वरित उपचार देत कोरोना नियंत्रणात आणण्यास मदत होते. त्यामुळे आता कोरोनाच्या चाचण्या वाढणार असल्याने ही सकारात्मक बाब म्हणावी लागेल.