मुंबई - देशभरात अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य सरकारने विमान, रेल्वे व रस्त्यामार्गे राज्यात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. ज्या प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह असेल अशा प्रवाशांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार असल्याचे राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे. या पत्राची अंमलबजावणी करावी, असे पत्र मुंबई महापालिकेने विमानतळ प्रशासनाला दिले आहे..
- 25 नोव्हेंबरपासून चाचण्या बंधनकारक
मुंबईसह राज्यात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या काही महिन्यात करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे रुग्ण संख्या कमी होत आली होती. धार्मिक सणांमुळे गर्दी वाढल्याने रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशातही अनेक राज्यात रुग्ण संख्या वाढू लागल्याने राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात 25 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल तरच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाईल. विमान, रेल्वे आणि रस्त्या ने येणाऱ्या सर्व प्रवाशांना हे नियम लागू असल्याचे राज्य सरकारच्या परिपत्रकात म्हटले आहे.
- लक्षणे नसलेल्या प्रवाशांना राज्यात प्रवेश
ज्या प्रवाशांनी कोरोना चाचणी केली आहे आणि ज्यांची चाचणी निगेटिव्ह आहे त्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांनी चाचणी केली नाही त्यांची अँटिजन चाचणी केली जाणार आहे. अँटिजन चाचणी निगेटिव्ह आली तर राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ज्यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह येतील त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले जावे, असे परिपत्रकात म्हटले आहे. रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी 96 तास आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तर विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 72 तासांपूर्वी कोरोना चाचणी करावी लागणार आहे. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना नोडल आशिकरी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- परिपत्रकाची अंमलबजावणी करा
या परिपत्रकाची अंमलबजावणी करावी, असे पत्र मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला लिहिले आहे. त्यात विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा कोरोना चाचणी अहवाल तपासावा, प्रवाशाने चाचणी केली नसल्यास त्याची विमानतळावरचचाचणी करावी, त्यासाठी लागणारे शुल्क प्रवाशांकडून घ्यावे, ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांना प्रवास करण्यास द्यावा किंवा त्यांना शहरात सोडावे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या प्रवाशांसोबत नियमानुसार कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - कंगना रणौत कार्यालय तोडक कारवाई : मुंबई उच्च न्यायालय 27 नोव्हेंबरला देणार निकाल
हेही वाचा - नरेडकोचा नवा प्रकल्प.. झिरो स्टॅम्प ड्युटीसह घ्या हक्काचे घर