मुंबई - वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर येथील कोरोना फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने वनरुपी क्लिनिकने डोअर टु डोअर स्क्रिनिंगला सुरुवात केली आहे. या कामाला वेग देत केवळ 7 दिवसात 1 लाख रहिवाशांचे स्क्रिनिंग पूर्ण केल्याची माहिती वनरुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी दिली आहे. वनरुपी क्लिनिकच्या १३ टीमने ही कमाल करत या परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, या स्क्रिनिंगदरम्यान १७० जणांना ताप आणि इतर लक्षणे दिसल्याने त्यांना पालिकेच्या माध्यमातून क्वारंटाईन करण्यात आल्याचेही डॉ. घुले यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे सामाजिक भान आणि रूग्णसेवा जपत महिन्याभरापासून वनरुपी क्लिनिकचे डॅाक्टर कोरोनाच्या लढ्यात पालिकेच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकले आहेत. मुंबईतील अनेक भागांत त्यांनी स्क्रिनिंग करत कोरोनाचे संभाव्य रुग्ण शोधून काढले आहेत. त्यामुळे याच वनरुपी क्लिनिकची मदत घेत वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगरमध्ये स्क्रिनिंग सुरु करण्यात आले. वनरुपी क्लिनिकच्या १३ टीम नियुक्त करत सात दिवसांपूर्वी या कामाला सुरुवात करण्यात आली.
गल्लीबोळात, घरोघरी जाऊन स्क्रिनिंग करत सात दिवसांत एक लाख नागरिकांची तपासणी केली आहे. यात १७० नागरिकांना ताप तसेच इतर लक्षण दिसली. त्यानुसार त्यांची पुढील चाचणी करण्यात येणार असून सध्या त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर पुढेही स्क्रिनिंगचे काम सुरु राहणार असून अधिकाधिक नागरिकांची तपासणी करत कोरोनाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न वनरुपी क्लिनिक करणार असल्याचेही डॅा. घुले यांनी सांगितले आहे.