मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोना नाव काढताच सर्वांचा थरकाप उडावा, अशी परिस्थिती झाली आहे. एकदा कोरोना झाला की मृत्यू अटळ, अशी अशीच धारणा निर्माण झाली आहे. मात्र, कांदिवली चारकोप येथील एका व्यक्तीने कोरोनावर मात केली आहे. रूग्णालय प्रशासनाने त्याचा सुट्टीही दिली आहे. तो रुग्णालयातून परतला तेव्हा त्याच्या सोसायटीतील लोकांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले आहे.
हेही वाचा- Coroanavirus : सेफ्टी किट नसल्याने मुंबईत डॉक्टरांचे कामबंद आंदोलन
मृत्यूच्या दाढेतून ही व्यक्ती परतली, तेव्हा सोसायटीतील नागरिक त्याच्या स्वागतासाठी जमले होते. टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. पाच दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तो संपूर्णपणे बरा झाल्यावर त्याला घरी सोडण्यात आले.
संबंधित व्यक्ती चारकोप येथील रहिवाशी आहे. त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळली होती. कोरोना रुग्णाजवळ गेल्यास आपल्यालाही कोरोनाची लागण होऊ शकते. हे लक्षात घेऊन या व्यक्तीला जेव्हा रुग्णालयात नेले गेले तेव्हा कोणीच त्याच्या जवळही फिरकले नाही. मात्र, जसा तो कोरोनावर मात करुन परतला तेव्हा त्यांचे सर्वांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. उपचारादरम्यान रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांनी माझी खूप काळजी घेतली. त्यांना माझा सलाम असे तो रुग्णालयातून आल्यावर म्हणाला.